महापालिकेच्या कचरा गाडीवर काम करताना अपघातात मरण पावलेल्या युनूस शेख याच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीच कापला जात नसल्याचे आढळून आल्यामुळे संतप्त कामगारांनी सोमवारी दुपारी पालिका मुख्यालयाच्या दारात युनूसचा मृतदेह ठेवून आंदोलन केले. जवळपास अर्धा तास महापौर व आयुक्त ज्या प्रवेशद्वाराने मुख्यालयात प्रवेश करतात तेथे मृतदेह ठेवून पाचशे कामगारांनी घोषणा दिल्या. यानंतर अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी युनूससह सर्वच कंत्राटी सफाई कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची माहिती घेण्याचे, तसेच युनूसच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी त्याचा मृतदेह तेथून उचलला.
पालिकेच्या घनकचरा आस्थापनेत एच-पूर्व विभागात कलिना येथे कचरा गाडीवर काम करत असताना युनूसचा गाडी उलटल्यामुळे शुक्रवारी अपघात झाला. शनिवारी त्याचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. पालिकेने सफाई सेवेचे कंत्राटीकरण केल्यानंतर मोठय़ा संख्येने कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून सफाईचे काम केले जाते. तथापि महापालिकेने ज्या ठेकेदारांना कंत्राट दिले आहे ते कामगाराचे भविष्य निर्वाह निधी भरतात का, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवतात का, याची कधीही पाहणी केलेली नाही, असा आरोप ‘कचरा वाहतूक श्रमिक संघा’चे नेते मिलिंद रानडे यांनी केला आहे. सोमवारी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त  दराडे यांच्याशी झालेल्या चर्चेत युनूसच्या भविष्य निर्वाह निधीची माहिती घेऊन त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी रानडे यांनी केली.