scorecardresearch

‘फेरीवाला हटाव’ मोहिमेमुळे दादर परिसरातील कचऱ्यात घट

दादर रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात दररोज सुमारे २० टन कचरा निर्माण होतो.

hawkers free movement
दादर रेल्वे स्थानकालगतच्या पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण पाच टनाने कमी झाले आहे.

स्थानकालगतच्या परिसरातून कचऱ्याचे प्रमाण पाच टनाने कमी; पालिका अधिकाऱ्यांकडून माहिती

‘फेरीवाला हटाव’ मोहिमेमुळे रेल्वे स्थानकांलगतच्या परिसराने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली असून स्थानक परिसरातील कचऱ्याचे प्रमाणही घटले आहे. मुंबईमधील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकालगतच्या पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण पाच टनाने कमी झाले आहे. दादर रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात दररोज सुमारे २० टन कचरा निर्माण होतो.

दादरमधील बाजारपेठ ही मुंबईतील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दादरमध्ये केवळ उत्सव काळातच नव्हे तर वर्षभर भाजीपाला, फळे, विविध वस्तू, कपडे आदींच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्यामुळे पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. फेरीवाल्यांमुळे होणारी गर्दी आणि कलकलाटाचा त्रास कायम पादचारी आणि आसपास राहणाऱ्या रहिवाशांना कायम सहन करावा लागतो. मात्र एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसेने रेल्वे स्थानक परिसरातील ‘फरीवाला हटाव’ मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरांमधील फेरीवाले गायब झाले असून रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. त्यामुळे पादचारी सुखावले आहेत. फेरीवाले गायब झाल्यामुळे आता या परिसरात होणाऱ्या कचऱ्यावरही नियंत्रण आले आहे.

दादर रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर फेरीवाले बसत होते. फेरीवाले भल्या पहाटेपासून भाजी, फळे, फुले आदीची मोठय़ा प्रमाणावर विक्री करीत होते. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होत होता. दादर रेल्वे स्थानकालगतच्या पश्चिम परिसरातून पालिका दररोज तब्बल २० टन कचरा उचलत होती. सकाळपासून हा भाग गजबजलेला असल्यामुळे दुपारनंतर कचरा वाहून नेण्याचे काम करावे लागत होते. आता मनसेच्या आंदोलनामुळे हा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. परिणामी, फेरीवाल्यांनी आपला गाशा गुंडाळल्यानंतर या परिसरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये सुमारे पाच टनाने घट झाली आहे. तसेच कचरा वाहून नेताना निर्माण होणारा फेरीवाल्यांचा अडथळाही दूर झाला आहे. परिणामी, कचरा गोळा करुन तो वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाअडथळा काम करणे शक्य होऊ लागले आहे. तसेच रस्ते आणि पदपथ मोकळे झाले असून वाहतुकीलाही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेरील सेनापती बापट मार्गावरुन विनाअडथळा वाहतूक होऊ लागली आहे. मुंबईत दररोज ७५०० टन कचरा निर्माण होतो. परंतु आता ‘फेरीवाला हटाव’ मोहिमेमुळे मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये काही प्रमाणात घट होऊ शकेल, असा विश्वास पालिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम परिसरात दररोज २० टन कचरा निर्माण व्हायचा, परंतु आता या परिसरात फेरीवाले बसत नसल्यामुळे कचऱ्यामध्ये सुमारे पाच टनाने घट झाली आहे.

-रमाकांत बिरादर, सहाय्यक आयुक्त, जी-उत्तर विभाग

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2017 at 02:27 IST