मुंबई : गेल्या तब्बल दोन दशकांपासून अधिक काळ केवळ चर्चा सुरू असलेल्या गारगाई धरणाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार असून २०२९ च्या पावसाळ्यापासून या धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात होईल. धरणामुळे बाधित होणाऱ्या ३ लाख झाडांचे पुनर्रोपण अंशतः बाधित होणाऱ्या चार गावातच करण्यात येणार आहे. तर त्याच्या पाचपट म्हणजे १५ लाख झाडांचे वनीकरण करण्यासाठी ६५८ हेक्टर जागा शोधण्यात पालिकेला यश आले आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी लागणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन महत्त्वाच्या परवानग्या अद्याप बाकी आहेत.
पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे. त्याकरीता पालिका प्रशासनाने या धरणाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून याबाबतचा प्रस्तावही स्थायी समितीने मंजूर केला आहे. आता लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. सध्या या ठिकाणी पूर्वप्राथमिक कामे सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळ व राज्य व केंद्रीय वन मंत्रालयाची परवानगी अद्याप बाकी आहे. या परवानग्या जुलै महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या ३ लाख झाडांच्या बदल्यात पर्यायी वनीकरण मुंबई महापालिकेला करावे लागणार असून त्याकरीता गेल्या किमान वर्षभरापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत जागेचा शोध सुरू होता.
जागेचा शोध पूर्ण झाला असून पर्यायी वनीकरणासाठी वनविभागाला निधी देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.पाणीपुरवठा प्रकल्पांमध्ये सल्लागार कंपन्यांवर वाढत्या अवलंबित्वाचा मुद्दा स्थायी समितीत वारंवार उपस्थित होतो. त्यामुळे बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने याबाबत एक सादरीकरण केले. त्यावेळी नगरसेवकांनी महापालिकेच्या बाह्य सल्लागारांवरील वाढत्या निर्भरतेबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी नगरसेवकांनी गारगाई धरणाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. तेव्हा बांगर यांनी ही माहिती दिली. मुंबई शहराला वर्षाला अंदाजे १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
भविष्यात, हे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे मुंबई शहराची पाण्याची गरज भागविण्याकरिता, कोयना धरणाचे आणि कोकण परिसरातील वाहून जाणारे पाणी मुंबई शहराकडे वळविण्यात यावे आणि या कामासाठी आवश्यक असणारा निधी राज्य व केंद्र शासनाकडून मिळविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आयुक्तांमार्फत समिती स्थापन करण्यात यावी, अशी सूचना स्थायी समिती सदस्य प्रकाश दरेकर यांनी यावेळी केली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतून दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत सध्या ४६०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची गरज आहे. त्यामुळे आजघडीला मुंबईला सुमारे ६०० दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईकरांना २०४१ मध्ये ६ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे.
गारगाई धरण
बांधून पूर्ण झाल्यास त्यातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे.पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ओगदे, खोडदे ही गावे पूर्णत: बाधित होणार असून तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. धरणामुळे बाधित होणाऱ्या सहा गावांचे देवळी गावात स्थलांतर करण्यात येणार आहे. बाधित होणारी तीन लाख झाडे धरणाजवळ ५ किलोमीटर अंतरावर पुनर्रोपित करण्यात येणार आहे.प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात ६५८ हेक्टर जमीनवर पर्यायी वनीकरण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
