मुंबई : पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले असून गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या प्रकल्पाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २०२० मध्ये ३१०० कोटी अंदाजित रकमेच्या या प्रकल्पाची किंमत सर्व करांसह ५३९६ कोटींवर गेली आहे.
मुंबईची लोकसंख्या वाढत असून पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई पालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. या सगळ्या प्रकल्पाचे काम रखडले आहे. गारगाई धरणासाठी लाखो झाडे कापावी लागणार असल्यामुळे हा प्रकल्प पालिका प्रशासनाने बाजूला ठेवला होता.
मात्र मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. त्यातच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे. गारगाई धरण प्रकल्पाला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या एप्रिल महिन्यात आढावा बैठक घेतली होती. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येताच गारगाई धरणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
असा वाढला प्रकल्प खर्च….
सन २०२० मध्ये या प्रकल्पाची अंदाजित किंमत तीन हजार १०५ कोटी रुपये होती. हीच मूळ किंमत आता ३ हजार २७६ कोटी रुपये झाली आहे. प्रकल्पबाधिताचे पुनर्वसनही करण्यात येणार असून त्यामुळे या खर्चात आणखी वाढ होणार आहे. विविध करासहित हा प्रकल्प खर्च एकूण ५ हजार ३९६ कोटी रुपयांपर्यत पोहचला आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प महागडा ठरणार आहे.
या धरण प्रकल्प कामात प्रकल्पबाधिताच्या पुनर्वसनाचाही समावेश असून त्याचा खर्च हा ४५० ते ५०० कोटी रुपये आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प खर्च वाढणार आहे.
गरगाई धरण बांधण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या परवानग्या अद्याप घेणे शिल्लक…
गारगाई प्रकल्पाला अद्याप केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची, तर केंद्र आणि राज्य सरकारची वन विभागाची परवानगी अद्याप प्राप्त झालेली नाही. येत्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रकल्प मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून खर्चात झालेली वाढ़ आणि अदयाप न मिळालेल्या महत्वाच्या मंजुरीमुळे बैठकीत त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
गारगाई धरणाची आवश्यकता
मुंबईत सध्या दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. प्रत्यक्षात आता मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज ४६०० दशलक्ष लिटर इतकी आहे. गारगाई धरण झाल्यास ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
२०१५ मध्ये सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी गारगाई धरण प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला आहे. गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे आणि ९७९. ४ मीटर लांबीचे धरण बांधणे तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशय दरम्यान १.६ किमी लांबीच्या जलवहन बोगद्याचे बांधकाम यासह अन्य कामे केली जाणार असून त्यासाठी एका संस्थेची निवड केली गेली आहे.
