मुंबई : गेल्या तब्बल दोन दशकांपासून अधिक काळ ज्या धरणाची केवळ चर्चा सुरू होती त्या गारगाई धरणाचा प्रस्तावाला स्थायी समितीने अखेर मंजुरी दिल्यामुळे हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने २०१३ मध्ये गारगाई धरण प्रकल्प बांधण्यास महापालिकेला परवानगी दिली होती. मात्र तब्बल १२ वर्षांनी या प्रकल्पासाठी अखेर निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. धरण बांधण्यास किमान चार वर्षांचा कालावधी लागणार असून एप्रिल २०३० मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.

पुढची शंभर वर्षे टिकेल असे भूकंपरोधक बांधकाम केले जाणार आहे. तसेच मध्य वैतरणा धरणाप्रमाणेच या धरणावरही विद्युत निर्मिती प्रकल्पही उभारला जाणार आहे. मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये मध्यवैतरणा धरण बांधले, त्यानंतर कोणतेही नवीन धरण किंवा पाणीपुरवठ्याचा स्रोत उभा केलेला नाही. त्यामुळे पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढली आहे. ही तफावत दूर करण्यासाठी पाणीपुरवठा वाढवणे आणि मलनिस्सारण व्यवस्था विस्तारित करणे यावर येत्या काही वर्षात लक्ष केंद्रीत करण्याचा मानस मुंबई महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात केला आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुधारणेसाठी

मुंबई महापालिकेने तब्बल १६,०९२ कोटी रुपये भांडवली तरतुदीचा व्यापक अर्थसंकल्प यंदा प्रथमच प्रस्तावित केला आहे. यामध्ये पाणी पुरवठा, सांडपाण्यावर प्रक्रिया, मलनिस्सारण प्रकल्प, नि:क्षारीकरण प्रकल्प, जलबोगदे, जल शुद्धीकरण केंद्र, वर्सोवा नि:क्षारीकरण प्रकल्प, गारगाई प्रकल्प असे अनेक प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. त्यापैकी सुमारे पाच हजार कोटींचा गारगाई धरण प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात गारगाई धरणासाठी ४३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीचा मुहूर्त साधत आचारसंहिता लागण्याच्या आधी गारगाई धरणासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. तर सत्ता स्थापनेनंतर पहिल्या महिन्यातच भाजप शिवसेना (शिंदे) महायुतीने गारगाई धरण मार्गी लावण्याचे ठरवले आहे.

स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत गारगाई धरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला होता. मात्र अंदाजित रकमेपेक्षा ११ टक्के बोली जास्त असल्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला होता. वाटाघाटीनंतर कंत्राटदाराने १.९६ टक्के दर कमी केला असून त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च २६८ कोटींनी कमी झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च ४३८० कोटींवर गेला आहे.

पालघर जिल्ह्यात धरण

गारगाई धरण हे मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे.

गारगाई नदीवर ६९ मी. उंचीचे, ९७९.४ मी. लांबीचे धरण बांधण्यात येणार आहेच, पण त्याचबरोबर गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे १.६ कि.मी. लांबीच्या जलवहन बोगद्याचे बांधकाम, मुख्यतः जलविद्युत जनित्र (Hydro Turbine), बुडीत क्षेत्रातील सर्व वृक्षांचे प्रत्यारोपण, बाधित गावांतील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पायाभूत सुविधांचा विकास ही कामे देखील केली जाणार आहेत.

९० च्या दशकात घोषणा

नव्वदच्या दशकामध्ये १९९४ मध्ये मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती मुंबई महापालिकेने गठीत केली होती. या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला.

राज्य सरकारने २०१३ मध्ये गारगाई धरण प्रकल्प मुंबईसाठी असल्याचे जाहीर केले होते. मात्र इतकी वर्षे हा प्रकल्प रखडला होता. मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये या प्रकल्पाचा ढोबळ खर्च ३१०५ कोटी ठरवला होता. वन विभागाला द्यावा लागणार मोबदला, बाधितांचे पुनर्वसन, बाधितांना नुकसान भरपाई, धरणाचे बांधकाम, जलबोगद्याचे जाळे हे धरून ढोबळ खर्च ठरवण्यात आला होता. मात्र अनेक वर्षे हा प्रकल्प रखडल्यामुळे खर्च वाढला असून आता केवळ बांधकामाचा खर्च ३०६५ कोटींवर गेला आहे. तर सर्व करांसह ही रक्कम ५०५१ कोटी वर पोहोचली आहे.

गारगाई

गारगाई धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर जलाशयात आणून पुढे गुरुत्वीय पध्दतीने अस्तित्वात असलेल्या जलवहन व्यवस्थेद्वारे मुंबई शहरास पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पावर एकूण १.२ मेगा वॉट जलविद्युत निर्मितीसाठी झोतयंत्राचे (Inline Turbine) संकल्पन व बांधकाम करण्यात येणार आहे. प्रकल्पस्थळी प्रशासकीय इमारत, कायमस्वरूपी अतिथीगृह आणि सभागृह आदींची उभारणी करण्यात येणार आहे.

प्रकल्पाविषयी…

१) गारगाई धरण प्रकल्प वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ बांधण्यात येणार आहे. हे धरण बांधून पूर्ण झाल्यास त्यातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे.

२) धरणामुळे बाधित होणाऱ्या सहा गावांचे देवळी गावात स्थलांतर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ओगदे, खोडदे ही गावे पूर्णत: बाधित होणार असून तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.

४) या प्रकल्पामुळे सहा गावांतील सुमारे ६१९ कुटुंबे बाधित होणार आहेत.

५) वनविभागालाही जमिनीचा मोबदला द्यावा लागणार आहे.

६) गारगाई धरण बांधून झाल्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची संख्या आठ होणार आहे. सध्या मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतून दर दिवशी ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

७) सध्या असलेल्या सात धरणांपैकी मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी ही पाच धरणे मुंबई महापालिकेच्या मालकीची आहेत. त्यात आणखी एका धरणाची भर पडणार आहे.

८) या प्रकल्पामुळे तानसा अभयारण्य बाधित होणार असून त्याकरिता वन्यजीव विभागाची परवानगी लागणार आहे. तसेच वन विभागाचीही परवानगी लागणार आहे.

९) या प्रकल्पामुळे राज्य महामार्ग देखील बुडीत जाणार असून तो देखील वळवावा लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग / महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास महामंडळ / राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आवश्यकतेनुसार राज्यमहामार्ग वळवणे, त्याकरीता

रस्त्याचे संरेखन आणि त्यासंबंधीत आवश्यक परवानग्या प्राप्त करणे व नवीन बांधकाम करणे ही कामे देखील करावी लागणार आहेत.

तीन लाख झाडे बुडीत…

या प्रकल्पामुळे तीन लाख झाडे बुडीत जाण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता. या प्रकल्पाला भाजपने पुनर्जिवित केले आहे. बुडीत क्षेत्रामुळे बाधीत झाडांचे (३.१० लक्ष झाडे) प्रत्यारोपण करणे /वनविभाग / संबंधित अभियंता यांच्या आदेशानुसार वृक्षरोपण करणे, जगविणे व देखभाल करणे ही जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे.