मुंबई : मुंबईची वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाला नुकतीच स्थायी समितीने मंजूरी दिली असून या प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पामुळे जी गावे आणि कुटुंबे बाधित होणार आहेत त्यांचे पुनर्वसन मुंबई महापालिका करणार असून या ग्रामस्थांना भरघोस मोबदला दिला जाणार आहे. एक रकमी पुनर्वसन भत्ता, बाधित जमिनीच्या पाच पट मोबदला, प्रत्येक कुटुंबाला अडीचशे चौरस मीटरचा भूखंड, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी अशा स्वरुपात ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गारगाई धरण बांधण्याचे ठरवले आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ओगदे, खोडदे ही गावे पूर्णत: बाधित होणार असून तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. गारगाई धरणासाठी ४२६ हेक्टर खाजगी जमीन पालिकेला खरेदी करावी लागणार आहे. धरणामुळे बाधित होणाऱ्या सहा गावांचे देवळी गावात स्थलांतर करण्यात येणार आहे.
या बाधित गावांचे आणि ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचा खर्च मुंबई महापालिका उचलणार असून त्याकरीता ग्रामस्थाना भरघोस मोबदला देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रशासनाने स्थायी समितीला सादर केली आहे.
या प्रकल्पामुळे सुमारे ६१९ कुटुंबे बाधित होणार आहेत. भूसंपादन व पुनर्वसनाचा खर्च मिळून पालिकेला २५७ कोटींचा खर्च येणार आहे. प्रकल्पबाधितांना मिळणार हा मोबदला …
१) प्रकल्पामुळे बाधित खाजगी मालकीच्या क्षेत्राच्या भूसंपादनासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभाव दराच्या चौपट व २०१७ च्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार अतिरिक्त २५ टक्के म्हणजेच एकूण पाच पट इतका मोबदला देण्यात येणार आहे. २) राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक कुटुंबाला कमाल २५० चौरस मीटर इतका भूखंड तसेच पंतप्रधान आवास योजनेनुसार बांधकामाची एकूण रक्कम २ लाख देणार
३) प्रकल्पामुळे भूमिहीन होणाऱ्या भूधारकाला किमान एक एकर सिंचित जमीन
४) कुटुंबातील एका सदस्याला नोकरी किंवा पाच लाख किंवा ४.८० लाख रुपये (२० वर्षांसाठी प्रतिमहिना किमान दोन हजार रुपये)
५) प्रकल्प क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रत्येक विस्थापित कुटुंबाला एक रकमी ५० हजार रुपये
६) गुरांसाठी गोठा, किरकोळ दुकाने यासाठी जागा, प्रतिकुटुंब २५ हजार रुपये, छोटे व्यावसायिक यांना एक रकमी २५ हजार रुपये
७) एक रकमी पुनर्वसन भत्ता प्रति बाधित कुटुंब ५० हजार रुपये
८) मुद्रांक व नोंदणी शुल्काचा संपूर्ण खर्च मुंबई महानगरपालिकेतर्फे
