मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील उर्वरित ९४ अतिक्रमित बांधकामांचे पश्चिम रेल्वेने तोडकाम सुरू केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) या बांधकामांमधील सर्व ९४ पात्र कुटुंबांचे कायमस्वरूपी पर्यायी घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गरीब नगर परिसरात मे २०२६ मध्ये पश्चिम रेल्वेने मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती. मात्र, पुनर्वसनासाठी काही बांधकामे राखून ठेवण्यात आली होती. आता या बांधकामांमधील पात्र कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित बांधकामे हटविण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार, पात्र बाधितांना सात दिवसांत जागा रिकामी करण्याचे आणि त्यानंतर ४८ तासांत रेल्वे प्रशासनाने निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
गरीब नगरमधील अतिक्रमण हटल्याने वांद्रे टर्मिनसच्या पूर्व परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या जागेवर आठव्या फलाटाची निर्मिती, गाड्या उभ्या करण्यासाठी स्टेबलिंग लाईनचा विस्तार आणि देखभाल सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. तसेच प्रवाशांच्या हालचालींसाठी अधिक जागा, प्रतीक्षेसाठी होल्डिंग एरिया आणि अन्य मूलभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे.
दरम्यान, वांद्रे रेल्वे स्थानकाची प्रवासी हाताळणी क्षमता वाढविण्यासाठीही विविध कामे प्रस्तावित आहेत. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी असलेल्या फलाटांवर १८ ते २२ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. भविष्यात २४ डब्यांच्या गाड्या उभ्या करता याव्यात, यासाठी फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. याशिवाय स्थानक परिसरात १० अतिरिक्त उपमार्गिका विकसित करण्याचे नियोजन आहे.
सध्या वांद्रे टर्मिनसमधून दररोज सुमारे २० लांब पल्ल्याच्या गाड्या चालविल्या जातात. प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर ही संख्या ३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या दररोज सुमारे ६० हजार प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. विस्तारानंतर आणखी ३० हजार प्रवाशांची भर पडून ही संख्या ९० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबरोबरच रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्यास लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
