मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्त गॅस टँकर हटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासह (एमएसआरडीसी) वाहतूक पोलीस आणि तज्ज्ञांना मोठी कसरत करावी लागत आहे. टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने टँकर क्रेनने उचलून हटविणे शक्य नाही. त्यामुळे अखेर आता तज्ज्ञांनी अपघातग्रस्त टँकरमधील गॅस इतर टँकरमध्ये भरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आतापर्यंत छोट्या दोन टँकरमध्ये गॅस भरून ते टँकर पुढे नेण्यात आले आहेत. अपघातग्रस्त टँकरमध्ये अजून ही गॅस आहे. हा गॅस इतर टॅंकरमध्ये भरण्यासाठी आणि अपघातग्रस्त टॅंकर रिकामा करून तो हटविण्यासाठी अजूनही दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी चार ते पाच तास लागणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.
मंगळवारी सायंकाळी पाच मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला. टॅंकरच्या तीन व्हॉल्वमधून गळती सुरू झाली. गॅस टॅंकरमधील ज्वलनशील गॅसमुळे स्फोट होण्याची भीती लक्षात घेता एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ महामार्ग पूर्णपणे बंद केला. त्यानंतर त्यांच्यासमोर गॅस गळती रोखणे आणि टॅंकर हटवित रस्ता मोकळा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले. हे आव्हान पेलण्यासाठी एमएसआरडीसीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एमएसआरडीसी) मदत घेतली. पण गॅस गळती रोखणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे महामार्ग बुधवारीही बंद राहिला.
बुधवारी दुपारी अखेर एमएसआरडीसीने भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि रिलायन्समधील तज्ज्ञांना पाचारण करण्याचा निर्णय घेतला. दुपारी तज्ज्ञांचे पथक दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अखेर टॅंकरचे दोन व्हॉल्व बंद करून गॅस गळती रोखण्यात यश आले. त्यानंतर काही तासाने गॅस गळती पूर्णपणे रोखण्यात आली. मात्र अपघातग्रस्त टॅंकर क्रेनने उचलून हटविणे शक्य नव्हते. ज्वलनशील गॅस असल्याने थोडीही चूक झाली तर स्फोट होण्याची वा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता तज्ज्ञांनी टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये भरून अपघातग्रस्त टॅंकर रिकामा करायचा. त्यानंतर रिकामा गॅस टॅंकर क्रेनने उचलून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी दिली.
अपघातग्रस्त गॅस टॅंकर प्रचंड मोठे अवाढव्य असून त्यात मोठ्या प्रमाणावर गॅस आहे. अशावेळी या टॅंकर इतके मोठे टॅंकर उपलब्ध न झाल्याने दोन छोटे टॅंकर आणण्यात आले. त्यात गॅस भरण्यात आला. त्यानंतरही अपघातग्रस्त टॅंकरमध्ये गॅस असल्याने आणखी टॅंकर मागविण्यात आले असून त्यात गॅस भरला जाईल. गॅस टँकर रिकामा करत तो हटविण्यासाठी आणखी दीड ते दोन तास लागणार आहे.
महामार्ग पोलिसांची प्रेसनोट
दि. ०४/०२/२०२६
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर, दिनांक ०३/०२/२०२६ रोजी १७.०० वा. चे सुमारास मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर कि.मी. ४१/००० आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलीन गॅस वाहतुक करणारा टॅन्कर पलटी होवून त्यामधील ज्वलनशील प्रोपेलीन गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून सदर घटनेबाबत प्रसार माध्यमे तसेच सोशल मिडीयाच्या माद्यमातून याबाबत माहिती देण्यात आली होती. सदर ठिकाणी महामार्ग पोलीस, रायगड जिल्हा पोलीस दल तसेच फायरब्रिगेड, एनडीआरएफ, बीपीसीएल, हेल्प फाउंडेशन व काही केमिकल एक्सपर्ट हे घटना घडल्यापासून गॅस गळती रोखून वाहतुक सुरळित करण्यासाठी प्रयत्नशील होते. पुणेकडे जाणारी वाहतुक हि दोन वाहिनीवरून सुरू ठेवण्यात आली आहे तसेच पुणे लेनवरील पहिल्या वाहिनीवरून मुंबईकडे येणारी वाहतुक सुरू ठेवण्यात आलेली आहे.
दिनांक ०४/०२/२०२६ रोजी २२.०० वा. केमिकल एक्सपर्ट यांनी सदर टॅन्करमधील वायु गळती रोखण्यासाठी अजून दोन तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतुक पुर्ववत करण्यात येईल. तसेच जुना मुंबई-पुणे (NH48) महामार्गावरील वाहतुक सुरळित चालू आहे.

