मुंबई : गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे वणवण भटकणाऱ्या नागरिकांची सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होत आहे. याचीच दखल घेऊन मुंबई पोलिसांनी नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी झोपडपट्टी भागात विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. चेंबूर पोलिसांनी सर्वप्रथम जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, या जनजागृती मोहिमेमुळे फसवणुकीला काही प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे सध्या संपूर्ण देशात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिक गॅस सिलिंडरसाठी भर उन्हात रांगा लावत आहेत. मात्र याचाच फायदा ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे घेत आहेत. नागरिकांच्या मोबाइलवर गॅस सिलिंडरबाबत बनावट संदेश पाठवून नागरिकांकडून ओटीपी मागण्यात येत आहे. ओटीपी मिळताच संबंधित नागरिकांच्या बँक खात्यातून काही मिनिटात भामटे पैसे वळते करत आहेत. काही जणांना बनावट लिंक पाठवून ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले जाते. या लिंकवर जाताच भामटे नागरिकांच्या मोबाइलचा पूर्णपणे ताबा मिळवून त्यांच्या खात्यातून काही मिनिटात लाखो रुपये गायब करत आहेत.

गेल्या काही दिवसात मुंबई शहरात आशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी फसवणूक होत असून याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पूर्व उपनगरातील चेंबूर पोलिसांनी या मोहिमेला सुरुवात केली असून गेल्या चार दिवसांपासून पोलिस परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून फसवणुकीबाबत माहिती देत आहेत. पोलिस विशेषतः झोपडपट्टी भागात जनजागृती मोहीम राबवत असून नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली.