मुंबई – दुचाकी, फोन, साखळ्या अशा चोरांचे लक्ष्य असलेल्या वस्तूंच्या यादीत आता सिलिंडरची भर पडली आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या एका चोरट्याने तब्बल ४६ गॅस सिलेंडर मुंबईच्या विविध भागातून चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. पवई पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तीन दुचाकीसह एकूण ४५ सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. याच दरम्यान ठाणे परिसरात राहणाऱ्या राज कांबळे (४५) या आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. तपासात गॅस सिलेंडर चोरी करण्यासाठी आरोपीने तीन दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सध्या देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याने गॅस सिलेंडर अधिक दरात विकला जात आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर चोरी करण्याची कल्पना सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मुंबईसह नवी मुंबई परिसरातून आशा प्रकारे या आरोपीने ४५ गॅस सिलेंडर चोरले आहेत. त्यानुसार त्याच्यावर पवई, शिवाजी पार्क, विक्रोळी आणि कामोठे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडर चोरल्यानंतर तो त्याच्या दोन साथीदारांकडे हे गॅस सिलेंडर विक्री करण्यासाठी देत होता. त्यानुसार पोलीस त्याच्या दोन साथीदारांचा देखील शोध घेत आहेत.