सायन- पनवेल महामार्गावर सोमवारी गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. या मार्गावरील चेंबूर परिसरात एचपी कंपनीची गॅस पाईपलाईन आहे. आज सकाळी ही पाईपलाईन फुटल्याचे लक्षात आले. यावेळी पाईपलाईनमधून वायूगळती होण्यास सुरूवात झाली होती.
त्यानंतर अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. या परिसरात वाहनांची मोठ्याप्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी तात्काळ वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर काही वेळापूर्वीच ही पाईपलाईन दुरूस्त करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. त्यानंतर सायन- पनवेल मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच ठाण्यातही टँकर उलटून वायूगळती झाल्याचा प्रकार घडला होता. ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा काजूपाड्याजवळ उलटला होता. त्यामधून अतीज्वलनशील वायूची गळती सुरु झाल्याने अत्यंत वर्दळीच्या अहमदाबाद-मुंबई महार्गावरील घोडबंदर रोडवर दोन्ही बाजूंची तब्बल दिवसभरासाठी ठप्प झाली होती. वायूगळती होऊ नये यासाठी फोमचा मारा टँकरवर करण्यात आला होता. मात्र, यादरम्यानच्या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक पवईमार्गे तर वसईकडे जाणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली होती. अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली होती.