उपाहारगृह मालक पदार्थाच्या किमती वाढविण्याच्या तयारीत

मुंबई : स्वयंपाकाच्या गॅस सििलडरच्या दरात झालेल्या वाढीचे चटके सामांन्यांबरोबरच उपाहारगृह मालकांनाही बसू लागले आहेत. व्यावसायिक गॅस सििलडरचा दर १,९५० रुपयांवर पोहोचल्याचे उपाहारगृह मालकांची चिंता वाढली आहे. गॅस सििलडरच्या दरात एका महिन्यात २६६ रुपयांनी, तर वर्षभरात ७६१ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी पदार्थाचे दर वाढविण्याचा विचार उपाहारगृह मालकांच्या पातळीवर सुरू असून त्याची झळ खवय्यांना बसण्याची शक्यता आहे.

करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता उपाहारगृहांची गाडी रुळावर येऊ लागली आहे. मात्र गॅसच्या दरवाढीचा दणका या व्यावसायिकांना बसला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, उपाहारगृहांचे भाडे, विविध कर यांचा भार डोक्यावर असतानाच गॅसच्या किमती वाढल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे. ‘आता कुठे ग्राहक उपाहारगृहांमध्ये येऊ लागले आहेत. अशा वेळी पदार्थाच्या दरात वाढ करता येणार नाही. पण जेवण तयार करायला लागणाऱ्या गॅसच्या किमती वाढत राहिल्या तर नाइलाज होईल,’ असे मत उपाहारगृहांच्या मालकांनी व्यक्त केले आहे.

‘गेल्या दीड वर्षांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यातच गॅसच्या किमती वाढल्याने व्यवसायावर नक्कीच परिणाम होणार आहे. ही दरवाढ तात्पुरती असेल तर ठीक आहे, पण सातत्याने वाढ झाली तर पदार्थाचे दर वाढवण्याखेरीज पर्याय नसेल,’ असे हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले.

दररोज छोटेखानी उपाहारगृहांना दोन, तर मोठय़ा उपाहारगृहांना स्वयंपाकाच्या चार ते पाच गॅस सिलिंडरची गरज भासते. मे महिन्यापासून गॅसचे दर सतत वाढत आहेत. केवळ गॅसच नाही तर पेट्रोल, डिजेलचे दर वाढल्याने वाहतुकीचाही खर्च वाढला आहे. हजारो रुपये केवळ इंधनावरच खर्च होत असल्याने मिळणारा नफा कमी होत आहे. त्यामुळे पदार्थाचे दर निश्चितच वाढतील.

शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार