मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने यावर्षी गौरी-गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५,२२० जादा बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर व परिसरातून कोकणातील विविध मार्गांवर या विशेष बस धावतील.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी जोडलेला सण असून, गणेशोत्सव, कोकण व एसटी यांचे अतूट नाते आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नफा-तोट्याचा विचार न करता प्रवाशांना अखंड सेवा देण्यासाठी एसटीने ५,२२० जादा बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर; तसेच ‘एमएसआरटीसी बस रिझर्वेशन’ या मोबाइल ॲप व सर्व बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आले आहे.
किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षण सुरू होणार आहे. गट आरक्षणात महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहील. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रमुख बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी २४ तास कार्यरत राहतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करून प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या
गणेशोत्सव काळात पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. त्याअंतर्गत विश्वामित्री–रत्नागिरी व रत्नागिरी–विश्वामित्री दरम्यानही विशेष गाड्या चालविण्यात येतील.
गाडी क्रमांक ०९११० विश्वामित्री-रत्नागिरी विशेष गाडी दर बुधवार व शनिवार विश्वामित्री येथून सकाळी १० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. ही गाडी १२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवली जाईल. शिवाय, गाडी क्रमांक ०९१०९ रत्नागिरी–विश्वामित्री विशेष दर गुरुवार व रविवार रत्नागिरी येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटेल व दिसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल. ही गाडी १३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान चालविण्यात येईल. गाडी क्रमांक ०९१२४/०९१२३ विश्वामित्री-रत्नागिरी-विश्वामित्री साप्ताहिक विशेष चार फेऱ्या चालविण्यात येतील.
०९१२४ विश्वामित्री-रत्नागिरी विशेष दर सोमवारी पहाटे ५.५५ वाजता विश्वामित्री येथून सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही गाडी १४ सप्टेंबर व २१ सप्टेंबर २०२६ रोजी सुटेल.
परतीची गाडी क्रमांक ०९१२३ रत्नागिरी-विश्वामित्री विशेष दर सोमवारी रात्री ९ वाजता रत्नागिरी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल. ही गाडीही १४ सप्टेंबर व २१ सप्टेंबर २०२६ रोजी चालविण्यात येईल. गाडी क्रमांक ०९०१३, ०९०१९, ०९०३०, ०९०२२, ०९११४, ०९११० व ०९१२४ चे आरक्षण ९ ऑगस्ट २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रांवर, ‘आयआरसीटीसी’ संकेतस्थळावर सुरू होईल.
