मुंबई : प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांचे नाव देण्यात आलेल्या ‘गेको – सायर्टोडॅक्टिलस वरदगिरी’ या पालीच्या प्रजातीचे आरे वसाहतीमध्ये नुकतेच दर्शन घडले. आरेमध्ये सायंकाळी फिरायला गेलेले वन्यजीव संशोधक राज जाधव, वन्यजीव प्रेमी ओंकार सावंत, कौशलेंद्र दुबे आणि पुष्पक तानावडे यांनी गेकोची नोंद केली.
गेकोवर पांढऱ्या – पिवळ्या कडा असलेले गडद काळे ठिपके असतात. या ठिपक्यांमुळे झाडावर असलेली गेको सहज दृष्टीस पडत नाही. ही एक निशाचर प्रजाती आहे. ती प्रामुख्याने पश्चिम घाट आणि मध्य भारतात आढळते. साधारणपणे ५.५ सेमी लांबीची गेको लहान कीटक खाते. दरम्यान, आरे येथील रस्त्यावर सायंकाळी चालत असताना विशिष्ट आवाज ऐकू आला आणि पानावरून काही तरी जाताना दिसले. बारकाईने निरीक्षण केले तेव्हा आम्हाला सायर्टोडॅक्टिलस वरदगिरी, किंवा ज्याला ‘गिरीज गेकोएला’ असेही म्हणतात त्याचे दर्शन घडले, असे वन्यजीव संशोधक राज जाधव याने सांगितले.
नावामागील कारण
भारतीय सर्प व सरपटणारे प्राणीतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांच्या नावावरून या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. भारतातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासात डॉ. वरद गिरी यांचे मोठे योगदान आहे.
इतिहास
– सायर्टोडॅक्टिलस वरदगिरी ही प्रजाती २०२१ साली अधिकृतपणे विज्ञान जगतात नोंदवली गेली.
– ही प्रजाती पश्चिम घाटात, विशेषतः महाराष्ट्रात आढळते.
– ही प्रजाती झाडांवर राहते.
वैशिष्ट्ये
– लांबट व वाकडी बोटे (ज्यामुळे ती झाडांवर सहज चढू शकते).
– अंगावरील तपकिरी व काळ्या रंगाची नक्षी.
– लहान आकाराची, सुमारे ६-८ सें.मी. लांब.
– ही गेको प्रजाती निशाचर (रात्री सक्रिय) असते.
वास्तव्य व स्थानिकता
पश्चिम घाटातील अरण्यांमध्ये, विशेषतः सह्याद्रीच्या काही भागांमध्ये ही प्रजाती आढळते.
फारशी ज्ञात नसलेली व दुर्मीळ प्रजाती.
संवर्धन स्थिती
या प्रजातीसंदर्भात आययूसीएनने अद्याप संवर्धन स्थिती निश्चित केलेली नाही, परंतु तिचा नैसर्गिक अधिवास मर्यादित असल्याने धोका संभवतो.