मुंबई : हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अमानुषपणे वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्सच्या (पेटा इंडिया) तक्रारीनंतर सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने जप्त पक्ष्यांचा तात्पुरता ताबा प्राणी निवारण केंद्राकडे सोपवण्याचे आदेश दिले.
‘पेटा इंडिया’कडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानकावरील फलाट क्रमांक १२ वर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) व रेल्वे पोलिसांनी तपासणी केली असता, गाडीच्या मालडब्यात पक्ष्यांचे ७ मोठे पिंजरे आढळले. त्यात ‘बजरीगर’, ‘फिंच’ व ‘कॉकटेल’ या प्रजातींचे सुमारे २,१०० पक्षी अत्यंत अरुंद जागेत कोंबलेले होते.
सुमारे ३२ तासांहून अधिक काळ प्रवासात पक्ष्यांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नव्हती, तसेच हवा, उजेड, अन्न व पाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती. हे पार्सल कल्याण येथील एका पाळीव प्राण्यांच्या दुकान चालवणाऱ्याच्या स्वाधीन करण्यात आले होते. मात्र, ‘पेटा इंडिया’चा विरोध व प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ६२ व ३२५ तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६०च्या कलम ११(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कल्याण येथील दुकानावर छापा टाकून ३३७ पक्ष्यांना ताब्यात घेतले. शासकीय पशूवैद्यकांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५५ पक्षी निपचित पडल्याचे आढळले. जबर शारीरिक आघातामुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले.
न्यायदंडाधिकारी मनोजकुमार बुधवंत यांनी मूळ मालकांचा ताबा मिळवण्याचा अर्ज फेटाळून लावला. ‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक नियम, २०१७’ नुसार न्यायालयाने जिवंत राहिलेल्या २८२ पक्ष्यांचा तात्पुरता ताबा रायगड जिल्ह्यातील कलुथे ॲनिमल ट्रस्ट या प्राणी निवारण केंद्राकडे सोपवण्याचे आदेश दिले.
