नेहमीप्रमाणे पावसाळय़ाच्या आगमनाबरोबरच यावर्षीही ‘महानिर्मिती’च्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांची ओल्या कोळशाची रडकथा सुरू झाली आहे. चंद्रपूरच्या प्रकल्पातील वीजनिर्मितीचे प्रमाण तब्बल ७०३ मेगावॉटपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे केंद्रीय कोटय़ातून जादा वीच खेचून राज्याची विजेची मागणी भागवण्यात येत आहे.
चंद्रपूरला २१० मेगावॉटचे चार संच आणि ५०० मेगावॉटचे तीन संच अशारितीने एकूण २३४० मेगावॉट क्षमतेचे सात वीजनिर्मिती संच आहेत. बुधवारी त्यातून अवघी सरासरी ७०३ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती. वीजप्रकल्पाला ओल्या कोळशाचा पुरवठा झाल्याने आणि त्यात माती-दगडाचेही प्रमाण अधिक असल्याने चांगल्या कोळशाअभावी वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे ‘महानिर्मिती’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात सुदैवाने सर्वदूर पावसामुळे वीजमागणी आटोक्यात आहे. तरीपण चंद्रपूरचा प्रकल्प ढेपाळल्याने विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्रीय कोटय़ातून सुमारे ५३० मेगावॉट वीज जादा घेऊन मागणी-पुरवठय़ाचा मेळ घातला गेला.