|| शैलजा तिवले
व्याख्येबाबत स्पष्टतेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत




जेनेरिक औषधे म्हणजे नेमके काय, याची कोणतीही व्याख्या कायद्यामध्ये नसल्याने या औषधांबाबत औषध प्रशासन, औषध विक्रेते, डॉक्टर आणि ग्राहक यांच्यामध्ये संभ्रमावस्था असताना जेनेरिक औषधे स्वतंत्र विक्रिस ठेवावी या केंद्राच्या सूचनेमुळे ही गुंतागुंत अजूनच वाढली आहे. त्यामुळे या सूचनेची अंमलबजावणी नेमकी कशी करायची याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
औषधांच्या दुकानात जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती व्हावी या उद्देशाने जेनेरिक औषधे स्वतंत्रपणे वेगळ्या रकान्यामध्ये विक्रिस ठेवावीत, अशा सूचनेचे परिपत्रक केंद्रीय महा औषधी नियंत्रक (डीसीजीआय)विभागाने मंगळवारी जाहीर केले.
जेनेरिक औषधे याची नेमकी व्याख्या उपलब्ध नसल्याने औषध विक्रेत्यांपासून ते अन्न व औषध प्रशासनापर्यत सर्वामध्येच जेनेरिक औषधे कशाला म्हणावे याबाबत संभ्रम आहे.
जनऔषधी दुकानातून विक्री केली जातात आणि सरकारकडून केंद्रीय पद्धतीने खरेदी करून विक्रीस पाठविली जातात, त्यांना जेनेरिक औषधे म्हणायचे, असे जनऔषधी विक्रत्यांचे म्हणणे आहे.
जेनेरिक औषधे म्हणजे फक्त मूळ औषधाचे नाव असलेली औषधे. मात्र आपल्याकडे अशी औषधेच उपलब्ध नाहीत. जवळपास सर्वच औषधांवर ब्रॅण्डचे नाव नमूद केलेले असतेच.
एखाद्या औषधाचा स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट संपल्यानंतर संशोधन केलेल्या कंपनीव्यतिरिक्त कोणतीही कंपनी त्या औषधाची निर्मिती करू शकते, अशा औषधांनाही जेनेरिक औषधे म्हणतात. मात्र आपल्याकडे अशी औषधे बॅ्रण्ड नावानेच बाजारामध्ये येत असतात. त्यामुळे ब्रॅण्डेड जेनेरिक अशी नवीनच संज्ञा रुजली आहे.
त्यामुळे खऱ्या अर्थाने जेनेरिक औषधे कशाला म्हणावे याची कायदेशीर व्याख्याच उपलब्ध नसताना अशारितीने सूचना करून औषधविक्रेत्यांमध्ये अजूनच गोंधळ निर्माण झाला आहे. तेव्हा जेनेरिक औषधांच्या व्याख्येबाबत अधिक स्पष्टता येणे गरेजेचे आहे, असे इंडियन फार्मासिटिक्युल असोसिएशनच्या उपाध्यक्षा मंजिरी घरत यांनी सांगितले.
भारतामध्ये एकाच कंपनीचे बॅ्रण्डेड जेनेरिक औषध असते आणि बॅ्रण्ड नावाचेही औषध असते. बॅ्रण्ड नावाच्या औषधांची डॉक्टरांकडे जाहिरात केली जाते. त्यामुळे यांच्या किंमती ब्रॅण्डेड जेनेरिकच्या तुलनेत अधिक असतात. तेव्हा फक्त जेनेरिक उल्लेख करणारे हे परिपत्रक गोंधळ वाढविणारेच आहे, असे मत आरोग्यसेनाचे राष्ट्रीय संस्थापक डॉ. अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केले.
औषधांच्या दुकानांमध्ये बहुतांश औषधे ही जेनेरिकच असतात. त्यामुळे स्वतंत्र विक्रीस ठेवण्याची व्यवस्था करणे हे वास्तविकरित्या शक्यच नाही, असे डॉ. अनंत फडके यांनी सांगितले.
तूर्त तरी सूचनाच
जेनेरिक औषधांची कायदेशीर व्याख्या उपलब्ध नसल्याने आम्हालाही औषधविक्रेत्यांना नेमके काय सांगावे, असा प्रश्न उद्भवला आहे. याच्या अंमलबजवणीवर बंधने नसल्याने सध्या तरी ही सूचना त्यांच्यापर्यत पोहचविण्यात येईल. मात्र भविष्यामध्ये यावर बंधने आणल्यास जेनेरिक औषधांची व्याख्या स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे अन्न व औषध प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.