युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी करोना कृती दलाकडे केली आहे.

आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचे नवा उत्परिवर्तित प्रकार आढळल्यास  त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या तेथे  आढळणाऱ्या करोना विषाणूच्या उत्परावर्तित रुपाची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी या देशांमधील जनुकीय क्रमनिर्धारण अहवाल मागविण्याची मागणी पालिकेने राज्य करोना कृती दलाकडे केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना लागण झाली असेल किवा विलगीकरण काळात बाधा झाल्याचे आढळल्यास त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार आहेत. या नमुन्यांमध्ये  करोनाचे नवे रूप असल्याचे आढळल्यास वेळीच सावध होता येईल. तसेच त्या देशांमधील ‘जिनोम सिक्वेन्सिंग’चे अहवाल असल्यास यांची तपासणी करणेही सोईचे होईल, असे पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या परावर्तित रुपानंतर आपल्याकडे येणाऱ्या प्रवाशांमार्फत याचा प्रसार होऊ नये यासाठी आता दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या प्रवाशांच्याही मुंबईत उतरल्यावर चाचण्या कराव्यात का याचा विचार केला जात आहे. तसेच अन्य काही उपाययोजना करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. आवश्यकता भासल्यास सध्याच्या चाचण्यांच्या नियमांमध्ये काही बदल करायचे असल्यास त्यानुसार केंद्रीय आरोग्य विभागाकडेही मागणी केली जाणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

वेळीच खबरदारी

करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना लागण झाली असेल किंवा विलगीकरण काळात बाधा झाल्याचे आढळल्यास त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार आहेत. या नमुन्यांमध्ये  नवा विषाणू  आढळल्यास वेळीच सावध होता येईल.