मुंबई : समाजवादी चळवळीचे दिवंगत नेते, माजी रेल्वेमंत्री, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जयंतीनिमित्त कुलाब्यातील एका चौकाला त्यांचे नाव देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्व आवश्यक परवानग्या घेऊन महापालिका कामगार – कर्मचारी वर्गाने त्या ठिकाणी तात्पुरता मंडप उभारला. मात्र, पोलिसांनी समारंभादरम्यान तो मंडप काढण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप महापालिकेतील कर्मचारी – कामगार वर्गाने केला. शासनाने याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पद्मविभूषण जॉर्ज फर्नांडिस यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेने कुलाबा येथील एका चौकास ‘पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशनने छोटेखानी समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. बुधवार, ३ जून रोजी नामफलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालिका व वाहतूक पोलिसांकडून कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. असे असतानाही एम.आर.ए मार्ग पोलिसांनी त्याठिकाणी १५ × १० फूट जागेत उभारण्यात आलेले व्यासपीठ ऐनवेळी काढून टाकण्याचा तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला.

अखेर पोलिसांच्या दबावामुळे आयोजकांनी मंडप हतविला. त्या घटनेमुळे उपस्थित कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी आणि कामगारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. देशाच्या राजकारणात आणि कामगार चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या, लोकशाही रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या आणि केंद्रीय मंत्री म्हणून देशसेवा करणाऱ्या साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाने आयोजित कार्यक्रमातच अशा प्रकारे अडथळे निर्माण होणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून शासनाच्या उदासीन भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना निर्माण झाली आहे.

हा कार्यक्रम महापालिकेने साजरा करायला हवा होता, पण त्यांनी तो केला नाही, अशी खंत आयोजकांनी व्यक्त केली. देशातील अनेक नेत्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. मात्र, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याच्या नावाने आयोजित कार्यक्रमाला आवश्यक परवानग्या असूनही अडथळे आणले गेले हा गंभीर प्रश्न आहे. हा प्रकार त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कामगार व सामान्य नागरिकांच्या भावनांचा अवमान करणारा आहे, असे म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुटेकर यांनी सांगितले.