मुंबई : गणशोत्सवानिमित्त संपूर्ण देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. जर्मनीतील हानाऊ शहरात यंदा प्रथमच येथील भारतीय समुदायाने ‘हानाऊ-लांगेनचा राजा’ गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतील जर्मनीत स्थायिक झालेल्या भारतीयांनी एकत्र येत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. कसाबा गणपतीची प्रतिकृती, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण, वृक्षारोपण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

जगभर राहणाऱ्या मराठी बांधवांकडून तसेच इतरही भारतीय समुदायाकडून विविध देशात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. जर्मनीत राहणाऱ्या भारतीयांकडूनही गणेशोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा येथील हानाऊ शहरात प्रथमच ‘हानाऊ-लांगेन’च्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. हेसेन इंडियन लेडीज असोसिएशन (एचआयएलए), पायोनियर इंडियन्स ई. व्ही हानाऊअर इंडियन्स व नमस्ते लांगेन आदी संस्थांच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

‘हानाऊ-लांगेन’ परिसरातील महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यांतून आलेल्या भारतीयांना एकत्र आणणे, नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच स्थानिक जर्मन समाजाशी सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला होता.

गणेशमूर्ती कार्यशाळा, वृक्षारोपण आणि विविध उपक्रम

पुण्यातील कलाकारांनी सादर केलेल्या ढोल-ताशा आणि लेझीममुळे हानाऊमध्ये भारतीयांना महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे वातावरण अनुभवता आले. याप्रसंगी ओडिसी, कथक, भरतनाट्यम्, कृष्णविषयक सादरीकरणे, भक्तिगीते सादर करत मुलांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना घडविले. मुलांसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा तसेच चित्रकलेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हानाऊ शहरातील भारतीय समुदायाचे हानाऊ शहराशी असणारे बंध अधिक दृढ व्हावे यासाठी हानाऊ-विल्हेल्म्सबाड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ‘आई फाऊंडेशन’ व संतोष गर्जे यांच्या सहकार्याने दुष्काळग्रस्त भागातील अनाथ मुलांना मदत करण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या गणेशोत्सवात हानाऊचे महापौर डॉ. मॅक्सिमिलियन बिएरी, फ्रँकफर्ट येथील भारताच्या वाणिज्यदूतावासाचे प्रतिनिधी अनिल पंडित, हानाऊ शहराच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मार्टिन होप्पे, नगरसेविका स्रिता हायडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच हा उत्सव यशस्वी होण्यासाठी हानाऊचे प्रदीप विधाते आणि लांगेनचे सागर तिडमे यांनी मेहनत घेतली.