Gold Investment Fraud in Ghatkopar : मुंबई: बाजारभावापेक्षा स्वस्त दरात सोने देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने सात ते आठ जणांची एकूण अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर घडली. याबाबत घाटकोपर पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
घाटकोपर पश्चिम येथे वास्तव्यास असलेल्या भारती भानुशाली यांची २०२३ मध्ये याच परिसरातील सोनल रबारी या महिलेसोबत ओळख झाली होती. या महिलेने आपण सोने विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे भारती यांना सांगितले. तसेच बाजारभावापेक्षा स्वस्त दरात सोने देत असल्याचेही सोनलने त्यांना सांगितले. त्यावेळी सोन्याचा दर प्रतितोळा ५७ हजार रुपये होता. मात्र सोनलने प्रतितोळा ५० हजार रुपये दराने सोने देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे भारतीने सुरुवातीला सोनलला सोने खरेदीसाठी साडेतीन लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपी महिलेने भारती यांना सोन्याचा दर वाढत असल्याचे अमिष दाखवून आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले.
भारतीने सोनलवर विश्वास ठेऊन पती, भाऊ, वडिल आणि इतर नातेवाईकांही ही बाब सांगितली. या सर्वांनी एकूण २ कोटी ३५ लाख रुपये सोनलला दिले. मात्र मे २०२५ ला अचानक आजारी पडल्याने उपचारासाठी गुजरात येथे जात असल्याचे सांगून सोनल फरार झाली. त्यानंतर अनेक दिवस तिचा मोबाइल बंदच होता. त्यामुळे भारतीने सोनलच्या गावी देखील जाऊन तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर काही दिवसांपूर्वी राजस्थान पोलिसांनी सोनलला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याची बातमी भारतीने वृत्तपत्रात वाचली. त्यानंतर भारतीने घाटकोपर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
