मुंबई : गॅस सिलिंडर घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या गाडीवरील तीन भरलेले सिलिंडर अनोळखी व्यक्तीने पळवल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. या प्रकरणी कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

इस्त्रायल, अमेरिका – इराण युद्धामुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर चोरीच्या घटना समोर येत आहेत.

घाटकोपर परिसरात काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे भरलेले गॅस सिलिंडर घेऊन एक कर्मचारी अमृतनगर परिसरात आला होता. परिसरात गॅस सिलिंडरची गाडी उभी करून तो ग्राहकांच्या घरी गॅस सिलिंडर पोहचविण्यासाठी गेला. मात्र परत आल्यानंतर गाडीवरील तीन गॅस सिलिंडर गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. कर्मचाऱ्याने परिसरात गॅस सिलिंडर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते न मिळाल्याने त्याने थेट घाटकोपर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.