मुंबई : मुंबईतील प्रवासाचा सर्वात वेगवान आणि आरामदायी पर्याय म्हणून मेट्रो ओळखली जात असली, तरीही ”बेस्ट”चा एक मार्ग प्रवाशांच्या सेवेतील आपले स्थान आजही कायम टिकवून आहे. घाटकोपर पश्चिम स्थानक आणि अंधेरी पूर्व येथील अागरकर चौक यांच्या दरम्यान धावणारा ए-३४० त्याच मार्गावर मेट्रो १ला (घाटकोपर-वर्सोवा) समांतर असूनही, प्रवाशांमध्ये आजही लोकप्रिय आहे.
शहरात मेट्रोची धाव जशी-जशी वाढत आहे, तस-तसे बेस्टचे प्रवासी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बेस्टची संख्या अपुरी असल्याने बसकरिता बराच वेळ प्रतिक्षा करावी लागते. प्रवासी मेट्रोसह इतर पर्यायी साधनांचा आधार घेत आहे. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या कमी होत आहे. परंतु शहरात आजही काही बेस्टचे मार्ग आहेत. जेथे प्रवाशांची बेस्टलाच पहिली पसंती आहे.
घाटकोपर आणि वर्सोवा दरम्यान केवळ आठ स्थानके असलेल्या मेट्रोच्या तुलनेत, बसमार्ग ए-३४० दरम्यान सुमारे २० बस थांबे आहेत. ज्यामुळे प्रवासी कोणत्याही बस थांब्यावर चढू-उतरु शकतात. अनेक प्रवाशांसाठी हीच बाब अत्यंत महत्वाची आहे. प्रवासाच्या अंतिम टप्प्यापर्यंतची जोडणी हेच या बसच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. या बसमध्ये केवळ ”एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत प्रवास करणाऱ्यांचीच गर्दी नसते. अनेक प्रवासी मार्गादरम्यान मधूनच बसमध्ये चढतात आणि विविध ठिकाणी उतरतात. मेट्रोची दोन स्थानके असतील, तेथे बसचे तीन ते पाच थांबे असतात; ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या जाण्याच्या ठिकाणाजवळ उतरता येते.
ए-३४० बस मार्ग चकाला, जे.बी. नगर, मरोळ, साकीनाका आणि असाल्फा यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक आणि निवासी केंद्रांतून जातो. ज्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी विशेषतः फायदेशीर ठरतो. बस आणि मेट्रोचे या मार्गावरील भाडे देखील समान आहे. घाटकोपर ते अंधेरी दरम्यानच्या प्रवासासाठी मेट्रो आणि वातानुकूलित बेस्ट बस दोन्हीचे भाडे २० रुपयेच आहे. तरीही, काही प्रवाशांच्या मते, बसचा प्रवास अधिक सुलभ आणि थेट आहे. बसकरिता जीने चढून दोन मजले वर जावे लागत नाही.तसेच प्रवास पूर्ण झाल्यानंतर खाली उतरण्यासाठी पुन्हा काही मिनिटांचा वेळ देखील वाया जात नाही. या मार्गावरील बेस्ट आणि मेट्रोच्या प्रवासात केवळ ५ ते १० मिनिटांचा फरक पडतो. ए-३४० बस मार्गावर दररोज सरासरी ८५० हून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी या मार्गावर ५ ते १० मिनिटांनी बस धावते.
