मुंबई : मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेल्या ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेला सेवेत दाखल होऊन शनिवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दहा वर्षांत ‘मेट्रो १’ मार्गिकेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दहा वर्षांत या मार्गिकेवरून तब्बल ९७ कोटी मुंबईकरांनी प्रवास केला आहे.

मुंबईत मजबूत आणि अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिली मार्गिका म्हणजे ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) अर्थात रिलायन्स इन्फ्राच्या माध्यमातून खासगी – सार्वजनिक सहभागातून या मार्गिकेची उभारणी करण्यात आली. या मार्गिकेच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी एमएमओपीएलवर आहे. ही मार्गिका ८ जून २०१४ रोजी सेवेत दाखल झाली. मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न या मार्गिकेमुळे पूर्ण झाले. या मार्गिकेला प्रवाशांची पसंती मिळत आहे. त्यामुळेच दहा वर्षांत ९७ कोटी प्रवाशांनी या मार्गिकेवरून प्रवास केला आहे. दिवसाला या मार्गिकेवरून ४.५ लाख प्रवासी प्रवास करतात.

हेही वाचा – मुंबई : पदवीच्या अंतिम सत्राच्या २२ परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर

हेही वाचा – पावसाळ्यात मध्य रेल्वेची नेरळ-अमन लॉज सेवा बंद, माथेरान – अमन लॉज शटल सेवा चालवणार

मेट्रो १ मार्गिकेवरून दिवसाला मेट्रो गाड्याचा ४१८ फेऱ्या होतात. या मार्गिकेवर १६ मेट्रो गाड्या धावत असून आतापर्यंत या गाड्यांनी १२.६ कोटी किमी प्रवास केला आहे. दरम्यान, या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढावी यासाठी अनेक बदल, उपाययोजना एमएमओपीएलने केल्या आहेत. असे असले तरी ही मार्गिका तोट्यात आहे. त्यामुळे ही मार्गिका एमएमआरडीएने विकत घ्यावी, असा प्रस्ताव एमएमओपीएलने ठेवला होता. हा प्रस्ताव मान्य करून ही मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच या मार्गिकेची मालकी एमएमआरडीएकडे येणार आहे.