मुंबई : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी बसला घाटकोपर छेडा नगर येथे बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष असे एकूण चार प्रवासी जखमी झाले.
मुलुंड आगारातील बस ए-३७३ बुधवारी सकाळी धावत होती. बस वैशाली नगरहून माहूलच्या दिशेने जात होती. छेडा नगर सिग्नलजवळ एक मोटारसायकल अचानक बससमोर आली, त्यामुळे बस चालकाने ब्रेक लावून बस थांबवले.
दरम्यान, मुंबईहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या एका टँकरने बसच्या उजव्या बाजूच्या मधल्या भागाला जोरात धडक दिली. या धडकेमुळे उजव्या बाजूच्या तीन खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि चार प्रवासी जखमी झाले. बस वाहकाने दोन महिला प्रवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले, किरकोळ जखमी झालेल्या एका प्रवाशाने रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला, तर अन्य एका जखमी प्रवाशाला नातेवाईकांनी दुसऱ्या रुग्णालयात नेले. या प्रवाशाला कोणत्या रुग्णालयात नेले याची माहिती बस वाहकाकडे उपलब्ध नाही. पोलिसांनी दोन्ही वाहने टिळक नगर पोलीस ठाण्यात नेली.
प्रवासी भाग्यश्री खेडकर यांच्या उजव्या डोळ्याखाली खिडकीच्या फुटलेल्या काचेमुळे दुखापत झाली. अदिती कोयंदे यांच्या उजव्या कोपराला आणि उजव्या पायाला काचेमुळे दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाला.
