मुंबई : निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर भामट्यांनी एका ७३ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून सहा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.घाटकोपरमधील पंतनगर परिसरात चेतना व्यास (वय ७३) आईसोबत राहतात.

चार दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एका इसमाने फोन केला. फोन करणाऱ्या इसमाने आपण निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत मतदार यातील आपले नाव चुकीचे असल्याचे सांगितले. नावात दुरुस्ती करण्यासाठी एक अर्ज पाठवण्यात येणार असून यामध्ये तत्काळ दुरुस्ती करण्याचे सायबर भांमट्याकडून सांगण्यात आले.

चेतना यांनी पडताळणी न करताच आरोपीने पाठवलेला अर्ज उघडला. अर्ज भरल्यानंतर आरोपीनी त्यांना १० रुपये शुल्क भरण्यास सांगितले. यासाठी आरोपीने त्यांना एक लिंक पाठवली. चेतना यांनी १० रुपये ऑनलाइन भरल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाइलवर आरोपीने ताबा मिळवला आणि त्यांच्या बँक खात्यातून सहा लाख रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर चेतना यांनी या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.