मुंबई: घाटकोपर -विद्याविहार, दादर मध्ये रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा वाद शमत नाही तोच आता अशा पट्ट्या गिरगाव परिसरातही दिसून आल्या आहेत. चर्नीरोड येथे चौपाटीजवळच्या पदपथावर शनिवारी रात्री अशा पांढऱ्या पट्ट्या दिसून आल्या. नंतर आम्ही गिरगावकर संघटनेने या पट्ट्यांवर काळा रंग फासून विरोध दर्शवला. या पांढऱ्या पट्ट्यांमुळे आता घाटकोपर, दादरमधील जैन विरूद्ध मराठी वाद गिरगावातही पोहोचल्याचे चित्र आहे.

गेल्या आठवड्यात विद्याविहार परिसरातील एका सोसायटीत जैन कुटुंबाने साधुंच्या आगमनासाठी पांढऱ्या पट्ट्या आखल्याचे प्रकरण उजेडात आले होते. समाजमाध्यमावरील इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी याबाबत समाज माध्यमावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद शमत नाही तोच शुक्रवारी अशाच पांढऱ्या पट्ट्या दादरमध्येही दिसल्या. दादरमधील गोखले मार्गावर जैन धर्मियांच्या प्रार्थनास्थळाच्या जवळील सार्वजनिक रस्त्यावर अशा पांढऱ्या पट्ट्या आखण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाने या पट्ट्या राखाडी रंग लावून झाकून टाकल्या. या वादाला एक दिवस उलटत नाही तोच अशाच पट्ट्या चर्नीरोड-गिरगाव परिसरातही दिसल्या आहेत.

चर्नीरोड परिसरातील चौपाटीलगतच्या पदपथावर अशी पांढरी पट्टी आखल्याचे रविवारी सकाळी दिसून आले. या पांढऱ्या पट्टीविरोधात आम्ही गिरगावकर या संस्थेने आक्रमक भूमिका घेतली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक गिरगावकरांनी एकत्र येऊन या पांढऱ्या पट्ट्यांवर रात्रीच्या सुमारास काळा रंग लावला. त्याबाबतची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर प्रसारित होऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून पालिकेच्या यंत्रणेला पांढरी पट्टी मिटवण्याबाबत निर्देश दिले. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी आम्ही गिरगावकर आणि मनसे या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलवून समज दिली.

दरम्यान, अशा पांढऱ्या पट्ट्या गिरगावात आखल्यास आम्ही त्याला विरोध करू असा इशारा आम्ही आधीच समाज माध्यमांवरून दिला होता. त्यानुसार आम्ही हा काळा रंग फासला, अशी प्रतिक्रिया आम्ही गिरगावकर संघटनेचे गौरव सागवेकर यांनी दिली.

मंगलवाडीतही पांढरी पट्टी

चौपाटी येथील पांढरी पट्टीचा वाद उघडकीस आल्यानंतर काही तासातच गिरगावातील मंगलवाडी परिसरातही एका जैन कुटुबाकडून रस्त्यावर पाढरी पट्टी आखत असल्याचे निदर्शनास आले. आम्ही गिरगावकरच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला.

मराठी विरुद्ध जैन…

पांढऱ्या पट्ट्यांचे हे लोण जैन बहुल भागात पसरू लागल्यामुळे त्यापाठोपाठ मराठी विरुद्ध जैन असा वादही चिघळू लागला आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधी कबुतरखान्यांवरून जैन विरुद्ध मराठी असा वाद झाल्यानंतर आता पांढऱ्या पट्ट्यांवरून पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

कशासाठी पट्ट्या …

जैन साधूसंत जेव्हा अनुयायांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या घराच्या मार्गावर अशा पट्टया आखल्या जात आहेत. उन्हाळ्यात जमीन तापते त्यामुळे अनवाणी चालणाऱ्या साधुसंतांच्या पायाला अशा पट्ट्यांमुळे उष्णता लागत नाही. तसेच जीवदयेची शिकवण देणारे जैन धर्मातील साधुसंत चालत असताना त्यांच्या पायाखाली जीवजंतू मरू नयेत, तसेच पावसाळ्यात जमिनीवर शेवाळ साचते व ते पायाखाली चिरडले जाऊ नये याकरीता या पट्ट्या आखल्या असल्याचे सांगितले जात आहे. अनेकदा जैन साधूच अनुयायांना मार्गावर पांढऱ्या पट्ट्या आखण्याची अट घालतात असेही सांगितले जात आहे.