मुंबई : घाटकोपर हिट-अँड-रन प्रकरणात १७ वर्षांच्या मुलाला मिळालेला जामीन सत्र न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला. अपघातानंतर महिन्याने त्याची जामिनावर सुटका करण्याच्या निर्णयाला मृत व्यक्तीच्या पत्नीने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या मुलाचा जामीन रद्द केल्यानंतर या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्याचे आणि त्याला बाल सुधारगृहात पाठवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीबुद्दीन शेख यांनी बाल न्याय मंडळाला (जेजेबी) दिले.

सोमय्या महाविद्यालयाजवळ ५ फेब्रुवारीच्या रात्री या अल्पवयीन मुलाने भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालवून दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार ध्रुमील पटेल याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी मीनल गंभीर जखमी झाली होती. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे, सदोष मनुष्यवध. इतरांचे जीवन आणि सुरक्षितता धोक्यात आणणे यासारख्या भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली या मुलावर आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, या अल्पवयीन मुलावर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्या”च्या तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बाल न्याय मंडळाने या मुलाला ७ मार्च रोजी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर, एप्रिल महिन्यात मृत व्यक्तीच्या पत्नीने या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. अल्पवयीन मुलाची सुटका केल्याने न्यायाला बाधा पोहोचते आणि गुन्ह्याशी संबंधित पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाकडे दुर्लक्ष केले जाते, असा दावा करून मीनल हिने मुलाला मंजूर केलेला जामीन रद्द करण्याची आणि त्याला बाल सुधारगृहात पाठवण्याची मागणी केली होती.