मुंबई : घाटकोपरमधील के.व्ही. के. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्या १७ शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले होते. याबाबत शिक्षक संघटनेकडून ठाम भूमिका घेऊन लेखी तक्रार केली होती. त्यानंतर अखेर १७ शिक्षकांना न्याय मिळाला आहे. मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक मुश्ताख शेख यांनी १७ शिक्षकांचे अन्यायकारकपणे कपात केलेले एक दिवसाचे वेतन तात्काळ देण्याचे आदेश के. व्ही. के. शाळेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांना दिले आहेत. त्यामुळे अखेर या शिक्षकांना न्याय मिळाला आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील के. व्ही. के. शाळेतील १७ शिक्षकांची महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्या या शिक्षकांचे सहा महिन्यांनंतर एक दिवसाचे वेतन शाळा प्रशासनाने कपात केले होते. त्या विरोधात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने भूमिका घेत शिक्षण निरीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक मुश्ताख शेख यांनी वेतन कपात करण्यात आलेल्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पुन्हा काढून त्यांना तात्काल अदा करण्याचे आदेश के. व्ही. के. शाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झाली. यासाठी राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांची निवडणूक आयोगाकडून निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती केली होती. त्यासाठी ऑक्टोबरमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण ठेवले होते. शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. त्यानुसार घाटकोपर पश्चिमेकडील के. व्ही. के. हायस्कूलमधील १७ शिक्षकांची निवडणूक प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकांना मुख्यांध्यापकांनी आयोगाच्या पत्राद्वारे निवडणुकीच्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षणाला उपस्थित राहणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नियुक्ती केलेले सर्व १७ शिक्षकांनी १४४ कलम अंतर्गत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून निवडणूक प्रशिक्षणास २१ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहिले.

मात्र के. व्ही. के. हायस्कूलच्या प्रशासनाने सहा महिन्यानंतर म्हणजे जून २०२५ मध्ये पत्रक काढून निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित राहिलेल्या १७ शिक्षकांचे वेतन कापले. वेतन कापण्यात आलेले शिक्षक हे अंबरनाथ, कल्याण, वसई, विरारहून घाटकोपर येथे शाळेत येत आहेत. या वेतन कपातीमुळे या शिक्षकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता.