मुंबई : मुंबईत सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला असून अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई केली.
घाटकोपर – मानखुर्द जोडरस्त्यालगतची सुमारे ११ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत बुधवारी, एका दिवसात १२०० हून अधिक अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी भूखंडाच्या सभोवताली संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत.
मुंबईतील अतिक्रमणे हटविण्यासाठी आणि भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा अर्थात ‘नेत्रम’ प्रणालीचा वापर करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून अतिक्रमणांचा शोध घेतला जात आहे. अतिक्रमणे शोधून संबंधित यंत्रणांना त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे. या प्रक्रियेस सुरूवात होण्याआधीच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
घाटकोपर – मानखुर्द जोडरस्त्यालगतच्या ११ एकर परिसरात उभारण्यात आलेली अतिक्रमणे बुधवारी हटविण्यात आली आहे. एका दिवसात १२०० हून अधिक अनधिकृत बांधकामे हटवूत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ११ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मौजे मानखुर्द, ता.कुर्ला, न.भू.क्र. १-२(पै) या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. २०११ नंतर झालेली ही अतिक्रमणे हटविण्यास बुधवारी सुरुवात करण्यात आली. या कारवाईत अपर जिल्हाधिकारी (अति-निष्का), पूर्व उपनगरे, उपजिल्हाधिकारी (अति-निष्का), उपविभागीय अधिकारी, पूर्व उपनगरे, सहाय्यक आयुक्त (एम – पूर्व विभाग) तहसीलदार (कुर्ला) सहाय्यक पोलीस आयुक्त, मानखुर्द पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यंत्रणंमधील अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते. ४०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका दिवसात १२०० हून अधिक अतिक्रमणे हटविली. आता अतिक्रमणमुक्त झालेल्या ११ एकर जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
