मुंबई : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने जामिनासाठी आणि गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. तसेच, त्याच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले. फलक दुर्घटना हे प्राक्तन होते. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा दावा करून भिंडे याने जामिनाची मागणी केली आहे. याशिवाय, आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा करून भिंडे याने अटकेलाही आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर भिंडे याच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, दोन्ही पक्षांचा तपशीलवार युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने याचिकेवर शुक्रवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले. हेही वाचा >>>तुरूंगातील ई-मुलाखत, दूरचित्रसंवाद प्रणालीच्या सुविधांची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश तत्पूर्वी, भिंडे हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओळख बदलून राजस्थानमधील उदयपूर येथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता. त्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर, १६ मे रोजी पोलिसांनी त्याला उदयपूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर गुजरातमार्गे त्याला दुसऱ्या दिवशी मुंबईत आणून अटक करण्यात आली, असा दावा मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवादाच्या वेळी केला. राजस्थान येथून मुंबईत आणल्यानंतर भिंडे याला १७ मे रोजी दुपारी १२.४० वाजता अटक करण्यात आली. अटकेनंतर २४ तासांच्या आत त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित करण्यात आले. त्याचवेळी, भिंडे याला अटकेची लेखी कारणेही देण्यात आल्याचा दावाही पोलिसांनी केला.