मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेच्या ‘एन’ विभागाने २८ बाधित बांधकामांवर मंगळवारी निष्कासनाची कारवाई केली. झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यानचा रस्ता मोकळा करण्यात आला. येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित बांधकामे अडथळा ठरत होती.

झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर स्थानिक रहिवासी, तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अरुंद रस्त्यामुळे वाहनांची कोंडी होण्याबरोबरच पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून वाहतुकीला अधिक जागा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित असून, त्यासाठी काही बांधकामे बाधित होत होती.

रुंदीकरणासाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून महापालिकेच्या एन विभागामार्फत गुरुवारी २८ बाधित बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. एन विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कारवाईच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.