मुंबई : घोडबंदरस्थित बाळकुम ते गायमुख रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी १२०० हून अधिक खारफुटी तोडण्याच्या मोबदल्यात भरपाई म्हणून केले जाणारे वनीकरण ठाणे किंवा नवी मुंबई परिसरात न करता गडचिरोली येथे करण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने सोमवारी कठोर शब्दांत ताशेरे ओढले. वनीकरणाबाबत दायित्त्वाचे भान राखा, पैसे देऊन जबाबदारी झटकू नका, असे खडेबोलही न्यायालयाने महापालिकेला सुनावले. तसेच, भरपाई म्हणून केलेल्या वनीकरणासाठी ठाणे किंवा नवी मुंबईत जागा शोधण्याचे बजावले.
भरपाई म्हणून केल्या जाणाऱ्या वनीकरणातील अवघे ३० ते ३५ टक्केच रोपटी जगत असल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच, हीच बाब लक्षात घेऊन तोडण्यात येणाऱ्या खारफुटीच्या तिप्पट वनीकरण करण्याचे, त्याच्या देखभालीची जबाबदारी घेण्याचे आणि त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करण्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून देण्याचे आदेश महापालिकेला दिले.
प्रकल्पाचा एक भाग म्हणून १३ किलोमीटरच्या रस्त्यावरील सुमारे १२०० खारफुटी आणि ५३ झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी नुकसानभरपाई म्हणून लावलेल्या झाडांच्या संख्येच्या तिप्पट वृक्षारोपण करावे लागणार आहे. तथापि, भरपाई म्हणून केल्या जाणाऱ्या वनीकरणाच्या तपशीलांमध्ये वनीकरण योग्यरित्या न झाल्यास काय केले जाणार याची कोणतीही माहिती नसल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. तसेच, भरपाई म्हणून लावलेल्या वृक्षांची देखभाव कशी घेणार हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेशही महापालिकेला दिले व वनाकरणासाठी फक्त पैसे देऊन जबाबदारी झटतू शकत नसल्याचे सुनावले.
काय घडले ?
रस्त्याच्या बांधकामासाठी तोडण्यात येणाऱ्या खारफुटींची भरपाई म्हणून पालघरसह ८०० किमीवर असलेल्या ग़डचिरोली येथे वनीकरण केले जाणार असल्याकडे मूळ याचिकाकर्ते बॉम्बे एन्व्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुपच्या (बीईएजी) वकील दीपाली बागला यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, महापालिकेची ही भरपाई उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या विसंगत असल्याचेही न्यायालयाला सांगितले. तथापि, या वनीकरणासाठी १५ हेक्टर जमीन शोधावी लागल्याचा आणि गडचिरोली ही त्यासाठी योग्य जागा असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील मिलिंद साठ्ये आणि वकील मंदार लिमये यांनी केला. याचिकाकर्त्यांच्या दाव्याची न्यायालयाने दखल घेतली. तसेच. भरपाई म्हणून केल्या जाणाऱ्या वनीकरणासाठी ठाणे आणि नवी मुंबईतच जागा शोधण्याचे आदेश दिले. तसेच, प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली.
प्रकल्प काय ?
घोडबंदर येथे बाळकुम ते गायमुख या रस्ता राष्ट्रीय महामार्ग-३, जुना आग्रा रोड, राज्य महामार्ग क्रमांक ४ आणि विरार-अलिबाग मल्टी-मॉडेल कॉरिडॉरसह प्रमुख मार्गांना जोडेल.हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर, जड मालवाहू वाहने, विशेषतः गुजरात आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे (जेएनपीटी) जाणारी वाहने वळवली जातील. त्यामुळे ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) द्वारे राबविला जाणार आहे.
