मुंबई : मुंबईमध्ये इ-बाइक टॅक्सीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर, धोकादायक आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रवासी वाहतुकीचा इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने तीव्र शब्दांत निषेध केला. ज्या बाइक टॅक्सी कंपन्यांविरोधात सुमारे ३६ गुन्हे दाखल आहेत, ज्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठमोठी विधाने केली, त्याच कंपन्यांच्या सेवांचे सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक उद्घाटन होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी टीका इंडियन गिग वर्कर्स फ्रंटकडून करण्यात आली.

मुंबईसारख्या अतिगर्दीच्या, अपघातप्रवण आणि अरुंद रस्त्यांच्या शहरात बाइक टॅक्सी चालविणे ही केवळ धोरणात्मक चूक नसून थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. फक्त ‘विद्युत वाहन’ हा शब्द वापरून प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे संरक्षण, विमा व्यवस्था आणि कायदेशीर चौकट याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

उबरशी संबंधित बाइक टॅक्सी वाहतुकीदरम्यान दोन मुंबईकरांचा मृत्यू झाला. यात एक चालक आणि एक प्रवासी होता. या कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या घटना आहेत. तरीही अशा वाहतुकीला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे. बेकायदेशीररित्या व्यवसाय करून निष्पाप नागरिकांचा जीव घेतलेल्या, गुन्हे दाखल असलेल्या उबर कंपनीला राज्याच्या परिवहन आयुक्तालयाचे अभय आहे का, असा प्रश्न इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

ज्या कंपनीविरोधात राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने सहा गुन्हे दाखल केले, त्याच कंपनीचे परिवहन विभागाने स्वागत केले. काही दिवसांपूर्वी प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे परिवहन विभागाने उबर कंपनीविरोधात गुन्हे दाखल केले. त्याच उबर कंपनीच्या बाइक टॅक्सीचे उद्घाटन करण्यात आले, ही बाब गंभीर आहे, अशी खंत भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

गिग वर्कर्स, बाइकचालक, रिक्षाचालक, कॅबचालक आणि सामान्य प्रवासी हे कोणत्याही खासगी प्रयोगासाठी वापरण्याचे साधन नाहीत. सुरक्षितता, पारदर्शकता आणि कायद्याचे पालन नसेल, तर याबाबत इंडियन गिग वर्कर्स फ्रंट तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या मागण्या

– मुंबईतील बाइक टॅक्सीच्या वाहतुकीची संपूर्ण कायदेशीर स्थिती तात्काळ जाहीर करावी.

– सर्व संबंधित कंपन्यांचे परवाने, विमा, चालक प्रशिक्षण आणि सुरक्षितता यांची तपासणी करावी.

– चौकशी पूर्ण होईपर्यंत बाइक टॅक्सी सेवांचे सर्व प्रचारात्मक व उद्घाटन कार्यक्रम थांबवावेत.

– वारंवार वादग्रस्त व जीवघेण्या इ-बाइक टॅक्सीला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.

——————