मुंबई : भूमिगत मेट्रोच्या कामामुळे गेल्या तब्बल आठ वर्षांपासून बंद असलेले गिरगावातील बेस्टचे बसमार्ग पुन्हा सुरू करावेत या मागणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हे मार्ग सुरू करावेत यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने महाव्यवस्थापकांना पत्र दिले, तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने या प्रश्नी महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेतली.

मेट्रो रेल्वेच्या गिरगाव व काळबादेवी स्थानकांच्या कामामुळे गिरगाव परिसरातील संपूर्ण जगन्नाथ शंकरशेट मार्ग खोदण्यात आला होता. त्यामुळे २०१७ पासून गिरगावातून जाणारे ६६, ६९, १२६, ८६ आणि ८८ हे बसमार्ग वळवण्यात आले होते. हे सगळे बसमार्ग महर्षी कर्वे मार्गावरून दक्षिण मुंबईकडे वळवण्यात आले होते. त्यामुळे गिरगावकरांना एक दीड किमीचा लांब चालत जाऊन

बस पकडावी लागत होती. मात्र आता मेट्रोचे काम पूर्ण झाले असून रस्ता ही पूर्ववत झाला आहे. त्यामुळे हे बसमार्ग पूर्ववत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांत चढाओढ लागली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून हे सगळे बसमार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे.

गेल्यावर्षी मेट्रोची गिरगाव आणि काळबादेवी ही दोन्ही स्थानके नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे बसमार्ग पूर्ववत करावे, अशी मागणी नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विभाग क्रमांक १२ च्यावतीने शिष्टमंडळाने बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची भेट घेऊन बेस्टचे मार्ग पूर्ववत करण्याची मागणी केली.

तसेच सिंदूर पुलाच्या कामासाठी बंद केलेला बसमार्ग क्रमांक ४१ (भाऊचा धक्का ते वाळकेश्वर) सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली. तसेच या विभागात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, अशीही भूमिका घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे यांचा समावेश होता.

शिवसेनेच्या दोन गटात चढाओढ…

मराठी बहुल विभाग म्हणून ओळख असलेला गिरगाव हा परिसर एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या काही वर्षांत या ठिकाणी भाजपचे मतदार वाढले आहेत. त्यातच शिवसेनेत फूट पडल्यामुळे या परिसरातही शिवसेनेचे दोन गट कार्यरत आहेत. त्यामुळे या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांनी बसमार्ग पूर्ववत करण्याची मागणी करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.