मुंबई : मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईमधील गिरगाव परिसरातील प्रसिद्ध ‘फुटाणेवाल्या बाईंचा’ वारसा पुढे नेणाऱ्या बाचल कुटुंबाने भाविकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा देखावा चाळीमधील छोट्याशा घरात साकारला आहे. मुंबईतील लालबाग, गिरगाव परिसरातील राजे, महाराजे, मुंबईतील पहिला गणपती आदी विसर्जनाच्या निमित्ताने गिरगाव चौपटीवर एकत्र येतात व सध्याच्या परिस्थितीवर संवाद साधतात. सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाबाबत या देखाव्यातून संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, बाचल कुटुंबाने गेली अनेक वर्षे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीऐवजी केवळ ‘श्रीफळा’चे विसर्जन करून नवा आदर्श ठेवला आहे.
गिरगावमधील ठाकूरद्वार परिसरातील आताच्या डॉ. बाबासाहेब जयकर मार्गावरील श्री भुवन चाळीत तळमजल्यावर वास्तव्यास असलेल्या ‘फुटाणेवाल्या बाईंनी’ १९०१ साली मिठाईचे दुकान सुरू केले. पुढे मिठाईचे दुकान व पाठीमागे निवासाची व्यवस्था अशी या दुकानाची रचना. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे साखरफुटाणे, बत्ताशे, पेढे, म्हैसूर पाक आदी मिळत होते व आजही याच गोष्टी मिळतात. अल्पावधीत हे दुकान फुटाणेवाल्याबाईंचे मिठाईचे दुकान या नावाने प्रसिद्ध झाले. कालौघात फुटाणेवाल्याबाईंनी कुणीही वारस नसल्याने नातेवाईक बळवंत बाचल यांना हे दुकान चालविण्यासाठी दिले. बाचल यांची पाचवी पिढी आज दुकान चालवित आहे. बळवंत बाचल यांचे पणतू संकेत यांनी या घरातील आतील खोलीत गणेशोत्सानिमित्त देखावा साकारला आहे.
अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात. परिणामी, गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाणारे रस्ते विसर्जन मिरवणुकांनी दुमदुमून जातात. संकेत यांनी देखाव्याच्या निमित्ताने आगळीवेगळी संकल्पना मांडून भाविकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. विसर्जनाच्या निमित्ताने भाविक ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती गिरगाव चौपाटीवर पोहोचतात. त्यात मुंबईमधील पहिला गणेशोत्सव अशी ओळख असलेला केशवजी नाईकांच्या चाळीतील पालखीत विराजमान झालेला गणपती, लालबागच्या मंडई परिसरातील ‘लालबागचा राजा’, गणेश गल्लीमधील ‘मुंबईचा राजा’, गिरगावातील निकदवरी लेनमधील ‘गिरगावचा राजा’, मुगभाटातील ‘गिरगावचा महाराजा’, चिराबाजारातील चंदनवाडीमधील ‘गोड गणपती’ व खेतवाडीतील ‘मुंबईचा महाराजा’ असे सगळे चौपाटीवर पोहोचल्यावर परस्परांशी संवाद साधतात.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या हेतूसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो साध्य होत आहे का, त्रास सहन करून दर्शनासाठी अनेक तास रांगेत उभी राहणारी भाविक मंडळी दैनंदिन आयुश्यात कसे वागतात का, चुरस, अहंकार, अतिउत्सामुळे होत असलेली निसर्गाची हानी, संस्कृती इतिहास व मूल्यांचा पडलेला विसर, प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यातील हरवलेला गोडवा, ऐक्याचा विसर या संदर्भात गणपतींत होणारा संवाद ऐकण्यासारखा आहे. या देखाव्यातून समाजाला ऐक्याचा, संस्कृती जपण्याचा आणि परस्परांशी निरपेक्ष भावनेने वागण्याचा संदेश देण्यात आला आहे.
हा देशावा साकारण्यासाठी संकेत बाचलने ठिकठिकाणच्या गणेशाची शाडूच्या मातीपासून छोटेखानी प्रतिकृती तयार केली आहे. शाडूची माती चौपाटीवरील वाळू, सन बोर्ड, कागदाचा वापर करून हा देखावा साकारला आहे. पर्यारणाची हानी होईल अशी कोणतीच वस्तू या देखाव्यात वापरलेली नाही, असे संकेत म्हणाला. प्रतिकात्मक विसर्जन बाचल कुटुंब गेली अनेक वर्षे गणेशोत्सवात चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करीत आहे. गणेशोत्सवानंतर ही मूर्ती घरीच असते. मात्र गिरगाव चौपाटीवर केवळ श्रीफळाचे विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता करण्यात येत आहे. अल्पावधीतच ‘फुटाणेवाल्याबाईंचा राजा’ या नावानेच बाचल कुटुंबाचा गणेशोत्सव परिचित झाला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर बाचल कुटुंबियांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.
