मुंबई : पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन आलेली नागरिक, ध्वज आणि ढोल ताशांचे सुरेख वादन, विविध संदेश देणारे चित्ररथ, हातात गुढी घेऊन घोषणा देणारी लहान मुले, कुठे शिस्तबद्ध पद्धतीने नऊवारी साडीत लेझीम खेळणारे महिलांचे पथक, दुचाकी रॅली आणि फोटो काढण्यात दंग झालेले लहान थोर, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मराठी कलाकारांची उपस्थिती असे मराठमोळ्या संस्कृतीचा जल्लोष करणारे वातावरण गुरुवारी गिरगावसह उपनगरातही दिसून आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या उपनगरात स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात येते. मात्र, दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे गेली अनेक वर्षे गुढीपाडव्याचे स्वागत भव्य स्वरूपात आणि जल्लोषात करण्यात येते. गिरगावातील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानकडून यावर्षी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्वागत यात्रेचे २४ वे वर्ष होते. यावेळी ‘वंद्य वन्दे मातरम्’ ही मुख्य संकल्पना घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमधील कर्तव्यपथावर प्रथम क्रमांक प्राप्त महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा चित्ररथ आणि यात्रेची मुख्य गुढी हाती घेतलेली स्वातंत्र्यवीर सारवकरांची २० फूट उंच मूर्ती या यात्रेतील मुख्य आकर्षण ठरले.

तसेच शिवसेना (ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ तसेच शिवसेना प्रतिष्ठान, गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘शक्ती आणि भक्ती – महाराष्ट्राची’ या संकल्पनेवर हिंदू नववर्ष स्वागत काढण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही संकल्पना साकारण्यात आली होती. तसेच या यात्रेत सुमारे ३५ ते ३८ भव्य चित्ररथ सहभागी झाले होते.

शिवसेना प्रतिष्ठान, गिरगाव यांच्याकडूनही राज्यातील संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे चित्ररथ, तसेच लहान मुलांची पारंपरिक दिंडी, गोविंदांचा आठ थरांचा थरारक देखावा हे या यात्राचे आकर्षण ठरले. तर ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’कडून हिंदू नववर्षाच्या निमित्ताने परळ ते लालबाग येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे घराणे (महाड), सरदार कृष्णाजी नाईक बांदल घराणे (हिरडस, मावळ) तसेच इतर अनेक शिवकालीन पराक्रमी सरदार घराण्यांनी सहभाग नोंदविला. तसेच मल्लखांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. गिरगावासह उपनगरातील दहिसर येथेही हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उपनगरातील नागरिकांची उपस्थिती

गिरगावातील स्वागत यात्रांना दादर, जोगेश्वरी, बोरीवली, मालाड ते थेट वसई आणि विरारमधील नागरिकांची उपस्थितीही मोठ्या संख्येने दिसून आली. यात उपनगरातून पारंपरिक वेषभूषेत आलेल्या महिलांची उपस्थितीही लक्षणीय होते. दुचाकी रॅलीसाठी महिला नऊवारी साडीसह पारंपरिक दागिने घालून आल्या होत्या . तसेच महिलांकडून दुचाकीवर विविध संदेशही यावेळी देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून उपनगरातील नागरिक गिरगावातील स्वागत यात्रांना उपस्थिती लावत आहेत. यामुळे गिरगावात नववर्ष स्वागत यात्रांमध्ये मराठी संस्कृतीचा जयघोष करण्यासोबतच उपनगरातील मराठी बांधव या निमित्ताने एकत्र येत असतात.

गिरगाव चौकात रांगोळीवरून वाद

गिरगाव चौकात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आलेल्या रांगोळीवरून शिवसेना (ठाकरे) गट आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान यांच्यात काही वेळ वाद निर्माण झाला होता. गिरगाव चौकात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून दरवर्षी भव्य रांगोळी साकारण्यात येते. गुरुवारी शिवसेना (ठाकरे) गटाची स्वागत यात्रा सुरु झाली असताना गिरगाव चौकात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आलेल्या रांगोळीचे नुकसान झाले. असे प्रतिष्ठानचे म्हणणे होते.

‘नियोजित वेळी आमची स्वागत यात्रा सुरु झाली. पोलिसांनी रांगोळीच्या भोवती असलेली बॅरीगेट्स हटवून आम्हला मार्ग मोकळा करून दिला. आमच्या स्वागत यात्रेमुळे रांगोळीचे कोणतेही नुकसान झाले नाही. स्वागत यात्रा पाहण्यासाठी बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक आले होते. शिवसैनिकांकडून रांगोळीची नासधूस करण्यात आली नाही. गर्दी असल्याने रांगोळीचे नुकसान झाले असेल. मात्र, शिवसैनिकांनी रंगीळीचे कोणतेही नुकसान केले नाही,’ असे शिवसेना (ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगतिले. गिरगावच्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर आगरकर म्हणाले की, ‘गिरगाव चौकात दरवर्षी आमच्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून भव्य रांगोळी काढली जाते. यंदाही गिरगाव कलामंचकडून तसेच प्रसाद मुंडे आणि इतर रांगोळी कलाकारांच्या सहकार्याने रांगोळी साकारण्यात आली होती. मात्र, काही राजकीय पक्षांकडून ही रांगोळी पुसण्याचा प्रयत्न केला गेला. रांगोळी ही एक कला असून ती अशा पद्धतीने पुसणे हे अयोग्य आहे. कारण कलाकारांची मेहेनत त्यामागे असते.’