मुंबई : दक्षिण मुंबईमधील गिरगाव परिसरातील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या खोताची वाडीतील विद्युतपुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंडीत होत असून ऐन पाणीपुरवठा होण्याच्या वेळीच वीज गायब होत असल्याने खोताची वाडीतील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या संदर्भात अनेक वेळा बेस्ट उपक्रमाच्या विद्युतपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र अद्यापही या समस्येचे निराकरण झालेले नाही. परिणामी, खोताची वाडीतील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
गिरगावमधील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेली खोताची वाडी मुंबईच्या वैभवांपैकी एक आहे. खोताच्या वाडीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येत असतात. त्यामुळे खोताच्या वाडीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेस्ट उपक्रमाने १९८५-८६ दरम्यान खोताच्या वाडीमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या होत्या. दरम्यानच्या काळात खोताच्या वाडीतील काही चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक घरातील विद्युत उपकरणांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे विजेच्या वापरात कित्येक पटीने वाढ झाली आहे.
बेस्टने १९८५-८६ मध्ये टाकलेल्या विद्युत वाहिन्या विद्युत दाब सहन करू शकत नाहीत. परिणामी, अधूनमधून विद्युतपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या आठवडाभरात खोताच्या वाडीतील विद्युतपुरवठा रात्री नऊ ते पहाटे ३ आणि कधीकधी पहाटे ५ नंतरही खंडीत होत होता. सध्या असह्य उकाडा होत असून विद्युतपुरवठा खंडीत झाल्यानंतर रहिवासी घामाच्या धारांनी त्रस्त होत आहेत.
दरम्यान, विद्युतपुरवठा खंडीत झाल्यानंतर त्याविषयी तक्रार करण्यासाठी अनेक रहिवाशांनी पाठक वाडी केंद्रातील दूरध्वनी केला. परंतु तेथे कुणीच फोन उचलत नाहीत, फोन उचललाच तर उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रारदारांची बोळवण करण्यात येते, तर फोनवर बोलणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी तर आपलीच रडगाणी तक्रारदारांना ऐकवली, असे रहिवाशांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाने ही समस्या सोडविण्यासाठी खोताची वाडीमध्ये काही ठिकाणी खोदकाम करून नवी केबल टाकली आहे. परंतु ही तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यामुळे भविष्यात विद्युतपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाने योग्य ती उपाययोजना करून हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, रहिवाशांनी बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांना या संदर्भात निवेदन सादर केले असून रहिवाशांचा प्रश्न समितीच्या बैठकीत मांडून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
