मुंबई : इराण-इस्त्राएल संघर्षामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने, मुंबईतील अनेक हॉटेल आणि खानावळींवर गंडांतर आले आहे. याचा फटका गिरगावातील ६० वर्षे जुन्या मराठी खानावळीलाही बसला असून, गॅसअभावी खानावळ गेल्या चार दिवसापसून बंद आहे. यामुळे या खानावळीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यासह,नागरिक,नोकरदार वर्गाला जेवणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गिरगावातील मराठी खानावळ कृष्णा महाडिक नरवणकर यांनी आपल्या भावांच्या मदतीने सुरु केली. कृष्णा नरवणकर वयाच्या ९२ वर्षापर्यत खानावळीत रोज यायचे. २०१६पासून त्यांच्या दोन मुली शमा आणि विद्या या खानावळ चालवत आहेत. विरारला राहणाऱ्या विद्या भालचंद्र पाटील सकाळी तर शमा कृष्णा नरवणकर संध्याकाळी खानावळीचे काम पाहतात.खानावळीत क्रॉफर्ड मार्केट,मरीन लाईन्स,गिरगाव,व्ही.पी रोड पोलिस स्थानक, सेफी रुग्णालय,बडोदा- कॅनरा बँकेतील कर्चमारी-अधिकारी जेवणासाठी येतात.

मराठी खानावळीत मांसाहारी आणि शाकाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवळ मिळते. दररोज सकाळी सुमारे ५० ते ५५ आणि रात्रीही तितकेच नागरिक या खानावळीत जेवतात. तीन दिवसाला एक गॅस सिलिंडर खानावळीत लागतो. सिलेंडर आरक्षित केल्यानंतर दोन तासांत उपलब्ध होत असल्याने सिलिंडरचा साठा केला जात नाही. परंतु गॅस सिलिंडरच मिळत नसल्याने शुक्रवार १३ मार्चपासून मराठी खानावळ बंद झाली आहे.

या खानावळीत ९० टक्के मासांहारी तर १० टक्के शाकाहारी जेवण असते. शनिवारी आरक्षित केलेला गॅस सिलिंडर रविवार दुपारपर्यत आला नाही. त्यामुळे खानावळीत काम करणाऱ्या आठ पैकी सहा मुलांनी रत्नागिरीतील आपले गाव गाठले आहे. शुक्रवारपासून खानावळ बंद असल्याने सुमारे ६० ते ६५ हजारांचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया

बुधवार ११ मार्चपर्यत एक सिलेंडर होता. गुरुवारी खानावळ बंद असते. शुक्रवारी गॅस नसल्याने खानावळ बंद करावी लागली. गॅस सिलेंडरचे बुकींग झाले आहे. पण तो केव्हा येईल हे माहित नाही. सिलेंडर आला की तुम्हाला संपर्क साधण्यात येईल असे गॅस वितरकाने सांगितले आहे. – शमा नरवणकर, मालक,मराठी खानावळ,गिरगाव

नागरिक,विद्यार्थ्याचे हाल

शिक्षणासाठी विद्यार्थी दक्षिण मुंबईत वास्तव्यासाठी आहेत. अनेक व्यावसायिक कार्यालये,रुग्णालये आहेत. पीजी सुविधा उपलब्ध आहेत. परिणामी या ठिकाणी राहणारे बहुतेक विद्यार्थी आणि नोकरदार खानावळींवरच अवलंबून असतात. खानावळी तात्पुरत्या बंद झाल्या अनेकांना बाहेरच्या हॉटेलांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अधिक खर्च करावा लागत आहे.