मुंबई : गिरगाव परिसरात वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याच्या घटनांमुळे गिरगावकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांसह प्रभावित भागांची मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी गिरगाव गायवाडी येथे बेस्टची विशेष बस तैनात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गिरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. चार – पाच तास वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पाण्याचे मोटर पंप चालवता न आल्यामुळे पाणीपुरवठाही होऊ शकत नाही. तसेच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना तासनतास वरच्या मजल्यांवर कोंडून राहावे लागत होते.
वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे गिरगावकरांनी आपला संताप समाज माध्यमांवरून व्यक्त केला. तसेच पाठकवाडी येथील बेस्टच्या तक्रार निवारण केंद्रावरही नागरिकांनी धडक दिली. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कुठे आहेत, असेही सवाल विचारला जात होता. त्यानंतर मंगळवारी मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी बेस्टच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. गिरगाव परिसरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे निर्देश दिले. दुरुस्तीचे काम अर्धवट सोडून निघून गेल्यास स्वतः धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
लोढा यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी गिरगावातील गायवाडी येथे बेस्टची विशेष बस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिकांना त्यांच्या समस्या नोंदविणे आणि त्यावर त्वरित कार्यवाही होणे सुलभ होईल. तसेच, दुरुस्तीच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त विद्युत उपकेंद्र उभारणार
येत्या काही महिन्यांत संपूर्ण गिरगाव परिसरात वीजेच्या वाढत्या मागणीचा आढावा घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त विद्युत उपकेंद्र उभारण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
ग्रॅंटरोड, गिरगावसाठी दुरुस्तीच्या गाड्या
सध्या फाटकवाडी येथून दुरुस्तीच्या गाड्या कार्यरत असून, त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे त्या सर्व ठिकाणी वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन, पुढील साधारण एक आठवड्यात डी व सी विभागासाठी दुरुस्तीच्या गाड्या ताडदेव विभागातून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित संपर्क क्रमांकही लवकरच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
