मुंबई : गिरगावमधील ठाकूरद्वार परिसरातील वैद्यवाडीत असलेल्या विठ्ठल – रखुमाई मंदिराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी महापालिका प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या विकास नियोजन विभागाने याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या आहेत. नागरिकांना येत्या २३ ऑगस्टपर्यंत महापालिका मुख्यालयातील विकास नियोजन (प्रमुख अभियंता) यांच्या कार्यालयात लेखी सूचना – हरकती सादर करता येतील.

ठाकूरद्वार येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर सुमारे २०० वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून स्वातंत्र्यपूर्व काळातही या परिसरातील सामाजिक व धार्मिक घडामोडींमध्ये या मंदिराला महत्त्वाचे स्थान होते. काही ऐतिहासिक लेखांमध्ये चाफेकर बंधू या मंदिरात येत असत आणि त्यांच्या काही हालचाली या परिसरातून होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. मंदिराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व वास्तुशास्त्रीय महत्व लक्षात घेऊन त्याची वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. वारसा स्थळांच्या श्रेणी – १ मध्ये मंदिराचा समावेश करण्याची मागणी करणारा अर्ज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला प्राप्त झाला होता. पुढील कार्यवाहीसाठी शासनाने महापालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने मंदिराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत नागरिकांच्या सूचना – हरकती मागविण्यात सुरुवात केली आहे.

स्थळदर्शन नकाशा, छायाचित्रे पाहण्यासाठी उपलब्ध

येत्या २३ ऑगस्टपर्यंत नागरिकांना त्यांच्या सूचना – हरकती महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीतील प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या कार्यालयात सादर करता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या सूचना आणि हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या मंदिराचा स्थळदर्शन नकाशा, छायाचित्रे महापालिका मुख्यालयातील उपवास्तुशास्त्रज्ञ (विकास नियोजन) यांच्याकडे उपलब्ध असून नागरिकांना कार्यालयीन वेळेत ते पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

अण्णा भाऊ साठे स्मारक प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन

१३ वर्षांच्या संघर्षाला यश

गिरगावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या संरक्षणाच्या लढ्यामध्ये विठ्ठल रखुमाई सेवा समितीने तब्बल १३ वर्षे न्यायालयीन, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर सातत्याने संघर्ष केला. समितीचे अध्यक्ष किशोर भाटकर, सचिव सुमित्रा हिर्लेकर, संजय मेर्वेकर, मिलिंद गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिराच्या संरक्षणासाठी अविरत पाठपुरावा केला. त्यांच्या चिकाटीमुळे मंदिराच्या हेरिटेज दर्जाचा प्रस्ताव अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अखेर १३ वर्षांच्या संघर्षाला यश आले आहे.