मुंबई: वरळीत मंगळवारी काढण्यात आलेल्या भाजपच्या जनआक्रोश मोर्चाच्या वेळी वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या एका महिलेच्या संतप्त प्रतिक्रियेला तोंड दिल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी आपले मौन सोडले. त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
या महिला खूपच संताप व्यक्त करत होत्या. त्यांनी बाटलीही फेकून मारली. तसेच त्या नको त्या भाषेत बोलत होत्या. त्यांची भाषा संवेदनशील नव्हती. त्यांना त्रास होत होता तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी व्यक्त केली.
भाजपच्या आंदोलनामुळे वाहतुक कोंडीत तासभर अडकलेल्या या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना गाठून अत्यंत कठोर शब्दांत मैदानावर जाऊन आंदोलन करा, म्हणून सुनावले होते. या संतप्त महिलेचे चित्रीकरण सर्वदूर पसरल्याने महिला आरक्षणाकरिता जनमत एकवटण्याकरिता वरळीत रस्त्यावर झालेले भाजपचे जनआक्रोश आंदोलन दुसऱया दिवशीही चर्चेत राहिले. विरोधकांनी या प्रसंगावरून भाजपवर टीकेची संधी साधली. या मोर्च्यात भाजपचे मंत्री, नगरसेवक, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाली. याचा मोठा मनस्ताप नागरिकांना झाला.
मोर्चात अटींचे उल्लंघन
भाजपच्या या मोर्च्याला पोलिसांची परवानगी होती. मात्र मोर्चाच्या दरम्यान पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महापौरांची दिलगिरी
वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांची गैरसोय झाल्याबद्दल महापौर रितू तावडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वरळीतील पूर्वनियोजित मोर्चाकरिता सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. नागरिक आणि वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते. तरिही लोकांना त्रास झाला असल्यास मुंबईची प्रथम नागरिक म्हणून माफी मागते, असे रितू तावडे यांनी स्पष्ट केले.
