मुंबईः खार येथील शाळेत हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. पण याबाबतची माहिती पोलिसांच्या निर्भया पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलीला उचलून रुग्णालयात नेले. त्यामुळे या मुलीचे प्राण वाचले. खार येथील शाळेत एका मुलीने हाताला काहीतरी करून घेतले असा दुरध्वनी खार पोलिस ठाण्यात आला. त्याबाबत माहिती निर्भया पथकाला देण्यात आली. त्यानुसार निर्भया पथक घटनास्थळी पोहोचले असता साधारण १५-१६ वर्षाची मुलगी बेशुद्ध पडलेली होती.
हेही वाचा >>> आईवरून चिडवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने ४३ वर्षीय व्यक्तीचा…; कांदिवली पश्चिममधील धक्कादायक घटना




मुलीच्या डाव्या हातावर सात ते आठ ठिकाणी कापल्याच्या जखमा होत्या. त्यावेळी निर्भया पथकातील महिला पोलीस शिपाई म्हात्रे यांनी तत्काळ मुलीला उचलून १०० मीटर चालत वाहनापर्यंत आणले. तिला तातडीने भाभा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले. त्यावेळी सहाय्यक फौजदार तेरवणकर, मजवेलकर हे म्हात्रे यांच्यासह उपस्थित होते. मुलीला तात्काळ रुग्णालयात नेल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे मुलगी शुद्धीवर आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून मुलगी बरी झाल्यानंतर तिला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला कोणी त्रास देत होते का, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलीचे प्राण वाचले. या कामगिरीची दखल घेऊन सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी खार पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाला प्रशिस्तिपत्रक देऊन त्यांचे कौतुक केले.