झोपेत असताना उंदीर चावल्याने प्राण गमावण्याची वेळ अवघ्या दीड महिन्याच्या तान्हुलीवर आली आहे. दहिसरच्या गणपत पाटील नगरात बुधवारी पहाटे ही घटना घडली. साक्षी यादव असे या मरण पावलेल्या बाळाचे नाव आहे,.
गणपत पाटील नगरमध्ये ४ थ्या गल्लीत जयप्रकाश यादव हे पत्नी रेणू आणि साक्षीसह राहतात. बुधवारी सकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे रेणू उठली असता तिला साक्षीचा गाल आणि नाक सुजल्याचे आढळले. सुरुवातीला काय झाले हे त्यांना समजले नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने साक्षीला भगवती रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उंदराने तिचा चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ज्या ठिकाणी यादव राहतात तो संपूर्ण परिसर झोपडपट्टीचा आहे. साक्षी रात्री झोपेत असतांना उंदराने तिला चावून कुरतडले आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचे एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश पालांडे यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू उंदराने चावल्याने झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.