छातीत गाठ आल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. चारकोप पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची  नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय बोर्डाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
भूमिका कनोजिया (२०) ही महाविद्यालयीन तरुणी चाककोपच्या सेक्टर ५ मध्ये रहात होती. तिच्या छातीत गाठ आल्याने शनिवारी  तिला चारकोपच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू असताना दुपारी दोन वाजता तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिले, तसेच भूल देण्याच्या औषधाचे प्रमाण अतिरिक्त झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. भूमिकाच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा कारणीभूत असल्याची तक्रार तिच्या पालकांनी चारकोप पोलीस ठाण्यात केली. चारकोप पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यची नोंद केली आहे. तिचा मृतदेश शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाला अद्याप आलेला नाही. या प्रकरणी जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय मंडळाचा अहवाल आल्यानंतर जर डॉक्टरांचा निष्काळजीपणा आढळला तर पुढची कारवाई केली जाईल, असे कोळी यांनी सांगितले. नेमके कुठले इंजेक्शन दिले, त्याची आवश्यकता होती का यासह इतर अनेक बाबी मंडळातर्फे तपासल्या जाणार आहेत. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी त्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली आहे.