केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नेहमीप्रमाणे यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. दिल्लीच्या ‘न्यू ग्रीन फिल्ड’ शाळेच्या एम. गायत्री हिने ५०० पैकी ४९६ गुणांची कमाई करीत या परीक्षेत पहिला येण्याचा मान मिळविला आहे. गायत्री वाणिज्य शाखेची आहे. तर नॉएडा येथील ‘अॅमिटी इंटरनॅशनल’च्या मैथिली मिश्रा, दिल्लीच्या केआरएमचा सौरभ भांबरी, पट्टोमच्या केंद्रीय विद्यालयाचा बी. अर्जुन यांनी ४९५ गुण मिळवित देशस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. यापैकी सौरभ आणि मैथिली हे कला शाखेचे आहेत हे विशेष.

देशभरातून १०,४०,३६८ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यापैकी ८२टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या (८२.७०टक्के) निकालाच्या तुलनेत यंदा टक्केवारीत किंचितशी घट आहे. यंदाही विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. विद्यार्थिनींचे (८७.५६टक्के) आणि विद्यार्थ्यांचे (७७.७७टक्के) असे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर थिरुवनंतपुरमचा निकाल इतर विभागांपेक्षा सर्वाधिक (९५.४१टक्के) आहे.