एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने पूर्वप्रेयसीवर चाकूने वार केल्याची घटना चेंबूरच्या वाशी नाका येथे घडली. त्यानंतर अटक टाळण्यासाठी हल्लेखोर तरुण जवळच्या एका २२ मजली इमारतीवर चढून आत्महत्येची धमकी देऊ लागला. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले.
अजय धोत्रे उर्फ काळू (२०) असे या तरुणाचे नाव आहे. बेरोजगार असलेला अजय वाशी नाका येथील अयोध्या नगर येथे राहतो. याच भागातील एक १६ वर्षीय तरुणी नेहाशी (नाव बदललेले) त्याचे प्रेमसंबंध होते. परंतु नेहाने नंतर त्याच्याशी संबंध तोडले होते. तरी तो गेल्या वर्षभरापासून तिच्या मागे लागला होता. मंगळवारी साडेअकरा वाजता नेहाचे आई वडील आणि भाऊ बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरात घुसला. तेथे त्याने तिचे तोंड ओढणीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. काही वेळाने नेहाची आजी घरी आली, तेव्हा दार उघडून अजय घरातून बाहेर पळून गेला. जखमी नेहाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, एक तरुण बांधकाम सुरू असलेल्या २२ व्या मजल्यावर उभा राहून आत्महत्येची धमकी देत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. हाच नेहावर हल्ला करणारा अजय असल्याचे समजले. त्वरीत पोलीस, अग्निशमन दल, दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी रवाना झाले आणि त्याला खाली उतरविण्याच प्रयत्न करू लागले. पोलिसांनी अजयच्या एका मित्राला वर पाठवून त्याच्याशी बोलायला लावले. नेहा ठीक आहे व तुझ्यावर काहीच कारवाई केली जाणार नाही, असे त्याच्या मित्राने सांगितल्यानंतर तो खाली आला. आरसीएफ पोलिसांनी अजयला अटक केली आहे. अटक टाळण्यासाठीच तो इमारतीवर चढून स्टंटबाजी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी सांगितले. नेहाची प्रकृती स्थिर आहे. बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीतील ६ पैकी एकही लिफ्ट सुरू नसल्याने पोलिसांची दमछाक झाली़
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2014 रोजी प्रकाशित
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने पूर्वप्रेयसीवर चाकूने वार केल्याची घटना चेंबूरच्या वाशी नाका येथे घडली. त्यानंतर अटक टाळण्यासाठी हल्लेखोर तरुण जवळच्या एका २२ मजली इमारतीवर चढून आत्महत्येची धमकी देऊ लागला.
Written by admin
First published on: 06-08-2014 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl stabbed for one sided love in mumbai