मुंबई : एक लाखांहून अधिक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना महामुंबईत घरे देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने खासगी विकासकांकडून स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. मात्र या निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, आता मंडळाने गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागेचा तसेच घरांचा शोध घेण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून निविदा प्रक्रियेच्या अटी-शर्तींत काही बदल करण्यात येत आहेत. हे बदल अंतिम झाल्यानंतर नव्याने निविदा काढल्या जाणार आहेत.
गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मालकी हक्काची कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पावणे दोन लाख अर्ज म्हाडाकडे सादर झाले असून यातील केवळ १६ हजार गिरणी कामगारांनाच मुंबईत घर देणे शक्य झाले आहे. तर दुसरीकडे उर्वरित दीड लाखांहून अधिक गिरणी कामगारांपैकी आतापर्यंत केवळ एक लाख ९ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी पात्रता निश्चितीसाठी अर्ज सादर केले आहेत. यातील एक लाख १ हजार गिरणी कामगार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. त्यामुळे एक लाखांहून अधिक गिरणी कामगार अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत असून त्यांच्यासाठी मुंबईत घरे बांधण्यासाठी जागाच नसल्याने राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
केवळ एकच निविदा प्राप्त
सरकारने यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून विविध पर्याय शोधले जात आहेत. सरकारने वांगणी आणि शेलूत ८१ हजार घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधून कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही संघटनांचा दोन्ही ठिकाणच्या घरांना विरोध असून त्यांनी ही घरे नाकारली आहेत. तर काही संघटना शेलूतील घरे घेण्यास तयार आहेत. सरकारच्या निर्देशानुसार मुंबई मंडळाने काही दिवसांपूर्वी बोरिवली, ठाणे, मीरा-भाईंदर आणि उलवे येथे कामगारांना घरे देण्यासाठी खासगी विकासकांकडून स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नसून केवळ एकच निविदा सादर झाली आहे.
अटीशर्तीत बदल केल्यास विकासक पुढे येण्याची शक्यता
प्राप्त निविदा चढ्ढा डेव्हलपर्सची असून या निविदेलाही कामगारांचा विरोध असून ही निविदा रद्द करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. मात्र नियमानुसार या निविदेची छाननी सुरू असून ही निविदा रद्द करायची की पुढील कार्यवाही करायची, याबाबत राज्य सरकारच अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. तर निविदेच्या अटी-शर्तींत काही बदल केल्यास, विकासकांना काही सवलती दिल्यास विकासक पुढे येतील, असे म्हणत आता सरकारने काही बदल सुचविले आहेत. हे बदल अंतिम होऊन त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर महामुंबईत कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
