“३५०० मराठा उमेदवारांना नियुक्ती दया, अन्यथा सभागृह चालू देणार नाही”

विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम १८ नुसार नियुक्ती देण्यात यावी अन्यथा हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल. तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाही तर विधीमंडळाचे सभागृह चालू देणार नाही असा इशारा विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते यांनी प्रविण दरेकर आज सरकारला दिला.

मराठा आरक्षण २०१८ अधिनियम ६२ क्रमांक १८ नुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र पुरस्कृत धरणे आंदोलन दोन दिवसांपासून आझाद मैदान येथे सुरु आहे. विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज (गुरूवार) आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगा त्यांच्याबरोबर आमदार राणा रणजितसिंह पाटील यांची उपस्थित होती. दरेकर यांनी धरणे आंदोलनास बसलेल्या उमेदवारांचा प्रश्न समजून घेत. मराठा समाजाच्या सुमारे ३५०० उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची सरकारकडे मागणी केली. आमच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणच्या अधिनियमानुसार या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचा दरम्यान काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ‘खो’ घातला. तसेच, हा विषय न्यायालयात योग्य पध्दतीने मांडला नाही, त्यामुळे या मराठा समाजाच्या या उमेदवारांवर अन्याय झाला असल्याचेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या या उमेदवारांना तातडीने नियुक्त करुन घेण्यात यावे. तसेच, न्यायालयामध्ये पुर्नविचार याचिका दाखल करावी व या उमेदवारांना न्याय मिळवून दयावा. अन्यथा मराठा समाजाला पुन्हा एकदा आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागेल व त्यावेळी मराठा समाजाला अडवणे कठीण जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. याचबरोबर दरेकर यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजप मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच बैठक –
मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात दरेकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यावर या विषयाच्या अनुषंगाने लवकरच बैठक निमंत्रित करण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दरेकर यांना दिले. तसेच या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने त्यांना या प्रश्ना संदर्भात लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती देखील दरेकर यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Give appointment to 3500 maratha candidates otherwise the house will not run praveen darekar msr