बदलत्या काळानुसार ज्याप्रमाणे संघाच्या गणवेशात बदल करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या हातात असलेल्या दंडुक्याच्या जागी एखादे शस्त्र द्यायला पाहिजे होते, असे मत शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच संघाने मोदी सरकारच्या माध्यमातून अयोध्येतील राममंदिर व समान नागरी कायद्याचा प्रश्न झटक्यात मार्गी लावावा असेदेखील सेनेकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून याबाबतचे विचार मांडण्यात आले आहेत.
विचार आणि व्यवहाराचा संघर्ष?
संघाच्या दृष्टीने त्यांचे स्वयंसेवक हे कवायती, संचलन, व्यायामाचे प्रकार वगैरे करीत असतात. त्यामुळेही ही एक बिनहत्यारी फौज आहे. हातात लाठी असली तरी सध्याच्या जमान्यात लाठीस कोणी हत्यार मानायला तयार नाही व लाठीने सध्याच्या स्थितीत लढताही येत नाही. त्यामुळे हातातील लाठीची जागा एखाद्या शस्त्राने घेतली असती तर देशाच्या दुष्मनांशी लढता आले असते, असे या अग्रलेखात म्हटले आहे. सध्या जी धर्मांधता, दहशतवाद वाढला आहे तो रोखण्याची ताकद आपल्या हातातील लाठीत आहे काय याचाही विचार बदलत्या काळानुसार संघाला करावा लागेल, असेही अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.
(गण)वेश असावा बावळा..
संघ हा भारतीय जनता पक्षाचा मायबाप आहे व भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांना नागपुरात जाऊन मसलती कराव्या लागतात यात चुकीचे काहीच नाही. देशातील सत्ताबदल हा संघाच्या रणनीतीमुळे, स्वयंसेवकांच्या कष्टामुळे झाला. त्यामुळे मोदी यांचे राज्य हे संघविचारांचे असेल तर मोदी सरकारकडून संघधुरिणांनी रखडलेली मोठी राष्ट्रकार्ये करून घेतली पाहिजेत. हाफ चड्डीतून आपण झटक्यात फुल चड्डीत आलो तसे झटकन अयोध्येतील राममंदिर व समान नागरी कायद्याबाबत ठोस भूमिका घेऊन हे कार्य पुढे रेटायला हवे, असा सल्ला सेनेकडून संघाला देण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल..